मुंबई : प्रसिद्ध ब्रिटिश कंपनी बेंटलेने पहिली लक्झरी एसयूव्ही बेंटेएगा भारतात लॉन्च झाली आहे. 3.85 कोटी रुपयांपासून या कारची किंमत सुरु होणार आहे. कारच्या डिझाईनबाबत बोलायचं, तर बेंटले कायम आपल्या कारना आकर्षक लूक देण्याच्या प्रयत्नात असते. ही कारही अशाचप्रकारे आकर्षक असून, कारप्रेमींना आकर्षित करेल, यात शंका नाही.
बेंटेएगाचं इंटिरिअर प्रचंड आकर्षक असून, हँडक्राफ्टेड वूड आणि लेदरचा वापर केला गेला आहे. बेंटेएगामध्ये 4 आणि 5 सीटर ले-आऊटचा पर्याय आहे. सर्व सीट्सना कँट्रास्ट स्टिचिंग आणि डायमंड डिझाईन देण्यात आलं आहे. मुलिनर टूरबिलियन ब्रिटलिंग क्लॉक हे फीचरही या कारमध्ये आहे.
बेटेंएगामध्ये 17 स्टँडर्ड कलर ऑप्शन्स देण्यात आले असून, 90 कलर शेड्सचाही पर्याय आहे. केबिनमध्ये 15 प्रकारचे कारपेट, 15 प्रकारच्या इंटिरिअर डिझाईन्सही आहेत. 20 इंचाच्या अलॉय व्हील स्टँडर्डही देण्यात आल्या आहेत.
बेंटेएगामध्ये 6.0 लीटरचं व्ही-12 ट्विन टर्बोचार्ज इंजिन आहे. 12 सिलेंडर असणारं इंजिन 600 बीएचपी क्षमता आणि 900 एनएमचं टॉर्क जनरेट करते.
कारचं टॉप स्पीड ताशी 301 किलोमीटर आहे. 4.1 सेकंदात ताशी 0 ते 100 किमी वेग पकडण्याची क्षमता या कारमध्ये आहे. यानुसार ही कार जगातील सर्वाधिक वेगवान एसयूव्ही कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.