मुंबई : जग एक खेडं झालंय, हे ज्या माध्यमाने अधिक ठळक केलं, तो म्हणजे सोशल मीडिया. जगभरातील कोट्यवधी लोक सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर अॅक्टिव्ह आहेत. या प्लॅटफॉर्मवरुन संवाद साधण्यासाठी जसे शब्द, फोटो, व्हिडीओचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे इमोजींचाही सर्रासपणे वापर केला जातो. हल्ली हल्ली तर इमोजीतूनच संवाद सुरु झालेलाही पाहायला मिळतोय. एकंदरीत इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
इमोजीची आज आठवण येण्याचे कारण म्हणजे, आज जागतिक इमोजी दिन आहे. 2015 सालापासून वर्ल्ड इमोजी डे साजरा करण्यास सुरुवात झाली. यंदा चौथे वर्ष असून, या दिवसाचं निमित्त साधत फेसबुकने इमोजींबाबत काही इंटरेस्टिंग माहिती आणि आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
फेसबुकवर सर्वाधिक वापरली जाणारी इमोजी तुम्हाला कळल्यावर तुम्हीही म्हणाल, जगात प्रेम वाढलंय. कारण लव्हची इमोजी गेल्या वर्षभरात सर्वाधिक वापरली गेली.
सध्या एकूण 2800 इमोजी आहेत, त्यापैकी 2300 इमोजी रोज फेसबुकवर वापरल्या जातात. ही संख्या नक्कीच खूप मोठी आहे. यावरुन इमोजीचा वापरही लक्षात येतो. शिवाय, मेसेंजरच्या माध्यमातून रोज किती इमोजी सेंड आणि रिसिव्ह होतात, याची आकडेवारी ऐकाल, तर आणखीच धक्का बसेल. फेसबुकच्या माहितीनुसार, फेसबुक मेसेंजरवरुन एका दिवसात 90 कोटींहून जास्त पाठवल्या जातात.
फेसबुकच्या पोस्टमध्ये सुमारे 70 कोटींहून जास्त इमोजींचा वापर होतो. सर्वात जास्त इमोजीचा वापर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला होतो, असेही फेसबुकच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
भारतात केक आणि त्यावर तीन मेणबत्त्या असे चित्र असलेली इमोजी सर्वाधिक वापरली जाते. भारतासह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी आणि स्वीडनमध्येही हीच इमोजी सर्वाधिक वापरली जाते. लव्हची इमोजी वापरण्यात दक्षिण कोरिया सर्वात पुढे आहे.
हसण्याची इमोजी वापरण्यात इंडोनेशिया, मेक्सिको, फिलिपाईन्स, थायलंड, अमेरिका, इंग्लंड, व्हिएतनाम या देशांमध्ये येते.