व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपवर पाठवण्यात येणाऱ्या बल्क मेसेजेसला आळा घालण्यासाठी कंपनीने आता मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे व्हॉट्सअॅपवर बल्क मेसेज पाठवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.


सध्या जगभरात व्हॉट्सअॅपचे 150 कोटी पेक्षा जास्त युजर्स आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर अनेकदा एखादा मेसेज मोठ्या प्रमाणावर लोकांना पाठवला जातो. बऱ्याचदा काही कंपन्यांकडून व्हॉट्सअॅपचा जाहिरातीसाठी वापर केला जातो. बल्क मेसेजेस पाठवून युजर्सला जाहिरीती पाठवल्या जातात. तर काही वेळा निवडणूक प्रचारातही व्हॉट्सअॅप बल्क मेसेजेस पाठवले जातात. अशा प्रकारे बल्क मेसेज पाठवण्याला व्हॉट्सअॅपची परवानगी नसून अनेकदा थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्स वापरून ते पाठवले जातात. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपने आता अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

बल्क मेसेजेसमुळे व्हॉट्सअॅपच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याने येत्या काळात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप ही सेवा वैयक्तिक मेसेजिंगसाठी सुरु करण्यात आलेली असल्याने या अॅपचा वापर करुन बल्क मेसेज पाठवणे योग्य नाही असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.