Adobe ही सॉफ्टवेअर कंपनी फेक फोटोंना आळा घालण्यासाठी लवकरच एक नवीन टूल बाजारात आणणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन तायर करण्यात येणाऱ्या या टूलचा वापर करुन एखाद्या एडिट केलेल्या फोटमध्ये काय काय बदल केले आहेत याची माहिती मिळवता येणार आहे. यामुळे फेक फोटो शोधणं सोयिस्कर होईल असा अंदाज सध्या लावला जात आहे.


ओरिजनल इमेज मध्ये काय बदल केले आहेत ते शोधण्यासाठी अॅडोबच्या या नव्या टूलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याला दिसणाऱ्या इमेजेसपैकी कोणत्या इमेजेस एडिट केल्या आहेत हे तर समजेलच सोबत त्यात नेमका काय बदल केला आहे तो देखील कळणार आहे.

या नव्या टूलची चाचणीदेखील अॅडोबने घेतली आहे. यासाठी त्यांनी फोटोशॉपमधील Face Aware Liquify या टूलचा वापर करुन काही फोटोंच्या फेशिअल फिचर्समध्ये बदल केले. फोटोशॉप केलेल्या या इमेजेस लोकांना दाखवल्यानंतर त्यापैकी केवळ 53 टक्के इमेजमध्ये बदल केल्याचं त्यांना ओळखता आलं तर अॅडोबच्या नव्या टूलने यापैकी 99 टक्के फोटो बरोबर ओळखल्याचं सांगितलं जात आहे.

सध्याच्या काळात फोटो, व्हिडीओ एडिट करुन ऑनलाईन विश्वात मोठ्या प्रमाणावर पसरवले जातात. अनेक ठिकाणी या फेक फोटोंचा गैरवापर केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या टूलचा फेक फोटो ओळखण्यासाठी नक्की फायदा होईल असं बोललं जात आहे.