मुंबई: व्हॉट्सअॅप सध्या अनेक नवनवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपनं 'चेंज नंबर', लाईव्ह लोकेशन असे नवे फीचर लाँच केले आहेत. आता व्हॉट्सअॅप आणखी एक नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. यापुढे यूजर्स आपल्या आवडीचे तीन चॅट आपल्या चॅट लिस्टमध्ये सर्वात वर ठेऊ शकतात.
सध्या या नव्या फीचरचं टेस्टिंग सुरु असून ते सध्या तरी रोलआऊट करण्यात आलेलं नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीचा किंवा ग्रुपचं चॅट टॉप पिन करु शकतात. एकदा का तुम्ही पिन हा ऑप्शन निवडला की, ते चॅट तुमच्या चॅट लिस्टमध्ये टॉप 3 मध्ये दिसू लागेल.
सध्या यामध्ये फक्त तीन चॅट यूजर्सला पिन करता येणार आहेत. त्यामुळे तीन पेक्षा अधिक चॅट तुम्हाला त्यात पिन करता येणार नाही.
ज्याप्रमाणे तुम्ही चॅट पिन करता तसंच तुम्हाला ते अनपिन देखील करता येईल. म्हणजेच तुमच्या टॉप 3 मधूनही काढता येईल. यासाठी तुम्हाला त्या चॅटवर थोडा वेळ प्रेस करावं लागेल. त्यानंतर अनपिनचा ऑप्शन तुमच्या समोर येईल. सध्या हे फीचर सरसकट मिळणार नाही. पण तुम्हाला आतापासून हे फीचर वापरायचं असेल तर अँड्रॉईड बिटा व्हर्जनवर ते उपलब्ध आहे.