नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोटीस पाठवल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने अफवा रोखण्यासाठी नवं फीचर आणण्याचं आश्वासन दिलं आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांमुळे देशभरात अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे.

“व्हॉट्सअॅपला आम्ही एक नोटीस पाठवली आहे. व्हॉट्सअॅपवरुन पसरणाऱ्या अफवांमुळे मागील काही दिवसांत जमावाकडून होणाऱ्या हत्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुलं पळवण्याच्या अफवेवरुन सर्वाधिक लोकांचे बळी गेले. यामुळे व्हॉट्सअॅपला आता सावध आणि जबाबदार व्हावं लागेल,” असं वक्तव्य रविशंकर प्रसाद यांनी केलं आहे.

व्हॉट्सअॅपने आयटी विभाग आणि गृह विभागासोबत विश्वासात राहून अशा अफवा रोखण्यासाठी काम करावे, असं आवाहनही रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअपला केले.

व्हॉट्सअॅपची प्रतिक्रिया

“व्हॉट्सअॅप लोकांची सुरक्षा आणि संवादाची काळजी घेत असून आम्हाला असं वाटत नाही की ही सेवा घातक आहे. कोणीही या सेवेचा वापर चुकीच्या पद्धतीने करु नये. या अफवा रोखता येतील, अशी व्यवस्था कंपनी लवकरच आणेल.” असं व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने म्हटलं  आहे.

अफवांमुळे 31 बळी

अफवांमुळे जमावाकडून हत्या होण्याचं लोण आता देशभर पसरलं आहे. देशातील 10 राज्यांत एकूण 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्हात अलिकडेच मुलं पळवल्याच्या संशयावरुन जमावाने पाच जणांचा बळी घेतला होता.

व्हॉट्सअॅपद्वारे खोटी माहिती पसरवून लोकांना चुकीच्या सूचना दिल्या जात आहेत. यामुळेच केंद्र सरकाने व्हॉट्सअॅपला हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा आदेश दिला होता.