मुंबई : व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. आता यूझर्स घरी असल्यास मोबाईलवरुन आणि ऑफिसमध्ये असल्यास डेस्कटॉपवरुन व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे. कारण व्हॉट्सअॅपकडून आता डेस्कटॉप अॅप लॉन्च करण्यात आलं आहे.

 

व्हॉट्सअॅपचं हे डेस्कटॉप अॅप वेब व्हॉट्सअॅपसारखं काम करेल. व्हॉट्सअॅपचं हे नवं डेस्कटॉप अॅप Windows 8 आणि त्यापुढील ओएस तर Mac 10.9 आणि त्यापुढील ओएसवर काम करेल. डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरल्यास डेस्कटॉप कीबोर्डच्या माध्यमातून चॅटिंगही वेगवान होते. शिवाय, टायपिंग करताना अडचणी येत नाहीत आणि अनेक शॉर्टकट्सचाही वापर करता येतो.

 



 

व्हॉट्सअॅपचं डेस्कटॉप अॅप डाऊनलोड करण्यासाठी आपल्या डेस्कटॉप ब्राऊजरवरुन https://www.whatsapp.com/download या लिंकवर जा आणि अॅप इन्स्टॉल करा. त्यानंतर व्हॉट्सअॅपचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं.

 

ऑफिसमध्ये काम करत असताना यूझर्सना आता वारंवार स्मार्टफोन पाहावं लागणार नाही. कारण काम करता करता तुम्ही व्हॉट्सअॅप वापरणं अधिक सुलभ होणार आहे. आता यूझर्स डेस्कटॉप अॅपला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.