नवी दिल्ली : फेक न्यूज, फोटो आणि फेक मेसेजेस आणि खोट्या माहितीच्या प्रसारामुळे सातत्यांने टीकेचे धनी झालेल्या व्हॉट्सअॅपने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपने 'चेकपॉईंट टिपलाईन' (Checkpoint Tipline) लॉन्च केले आहे. 'चेकपॉईंट टिपलाईन'च्या मदतीने युजर्सना त्यांना मिळालेला मेसेज अथवा माहिती खरी आहे की खोटी याबाबत खात्री करुन घेता येईल.


आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी खोट्या बातम्या आणि खोट्या माहितीपासून युजर्सना दूर ठेवणे हे समाज माध्यमांपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. गेल्या काही दिवसांपासून फेसबुककडून त्यासाठी विशेष उपायजोजना राबवल्या जात असताना फेसबुकने स्वतःच्याच मालकीच्या व्हॉट्सअॅपसाठीदेखील महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत.

व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुकने याबाबत म्हटले आहे की, भारतातल्या स्किलिंग स्टार्टअप PROTO ने टिपलाईन लॉन्च केले आहे. या टिपलाईनद्वारे एक डेटाबेस तयार केला जाईल. याद्वारे निवडणुकांदरम्यान फेक न्यूज आणि माहितीचा अभ्यास केला जाईल. त्यामुळे खोट्या माहितीचा प्रसार थांबवणे व्हॉट्स्अॅपसाठी सोपे जाईल.