मुंबई : एक कॉल आणि तुमचं व्हॉट्सअॅप हॅक! तुमच्या-आमच्या सर्वाधिक वापरातलं अॅप अर्थात व्हॉट्सअॅप हॅकर्सच्या निशाण्यावर आलं आहे. त्यामुळे जगभरातील यूझर्सना अॅप अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


मित्र-मैत्रिणींच्या टाईमपास गप्पा असो, ऑफिसातील कामं असोत, आई-वडिलांना निरोप पोहचवणं किंवा पैशांची देवाण-घेवाण असो, व्हॉट्सअॅपवाचून आजकाल बऱ्याच जणांचं पान हलत नाही. पण या व्हॉट्सअॅपवर हॅकर्सची वक्रदृष्टी पडल्यामुळे अनेक यूझर्स चिंताग्रस्त झाले आहेत.

एका व्हॉईसकॉल सरशी तुमच्या स्मार्टफोनमधील सगळी माहिती, फोटो, व्हिडिओ हॅकरच्या हाती जाण्याची शक्यता आहे. इस्रायली सायबर सिक्युरिटी कंपनी एनएसओ ग्रुपने एक कोड डेव्हलप केला आहे. या कोडच्या मदतीने व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक करणं सोपं झाल्याची माहिती 'द फायनान्शिअल टाईम्स' या वृत्तपत्राने दिली आहे. एनएसओ ग्रुपने मात्र हॅकिंगचं वृत्त फेटाळलं आहे.

Whatsapp Hacking | व्हॉट्सअॅप वापरताना सावधान, व्हॉईस कॉलच्या साहाय्याने अकाऊंट हॅकिंग



एनएसओ कंपनी पेगासस सॉफ्टवेअर वापरते. ज्यामुळे त्यांना कुठल्याही स्मार्टफोनमधील संभाषण, कॅमेरा आणि लोकेशनची माहिती मिळवणं शक्य आहे. तरी आपण डेटा हॅकिंग नाही तर डेटा सुरक्षेवर लक्ष देत असल्याचं एनएसओ कंपनीने स्पष्ट केलं आहे. शिवाय यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचं आश्वासनही दिलं आहे.

व्हॉट्सअॅपची मालकी आता फेसबुककडे आहे. आधीच फेसबुकला डेटा लीकचं ग्रहण लागलं आहे. ते नीट सांभाळण्यासाठी नाकीनऊ येत असतानाच आता त्यांच्याच मालकीच्या व्हॉट्सअॅपच्या डेटा सुरक्षेवर मोठं संकट उद्भवलं आहे.

व्हॉट्सअॅपला डेटा हॅकची माहिती कळताच त्यांनी तात्काळ त्यावर उपाययोजना केल्या. जगभरातील यूजर्सना अॅप अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अपडेटमध्ये हा लूपहोल फिक्स करण्यात आल्याची ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे अँड्रॉईड, अॅपल, विंडोज, गूगल यापैकी कुठल्याही सिस्टमचा स्मार्टफोन असला, तरी त्यातलं व्हॉट्सअॅप तात्काळ अपडेट करा, अन्यथा एक कॉल येईल आणि तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होईल.