मुंबई : व्हॉट्सअॅपवरील फोटो किंवा व्हिडीओ डाऊनलोड केल्यानंतर ते आपल्या मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये दिसतात. तसे थेट गॅलरीत कोणताही फोटो किंवा व्हिडीओ दिसू नये म्हणून व्हॉट्सअॅपने नवीन फीचर आणले आहे. अँड्रॉईड यूझर्सना नव्या अपडेटमध्ये हे फीचर उपलब्ध करुन दिले जाईल.

अनेकदा आपले मित्र किंवा मैत्रिणी केवळ आपल्यासाठीच एखादा फोटो किंवा व्हिडीओ पाठवतात, जे इतरांनी पाहू नये असे असतात. म्हणजेच खासगी ऑब्जेक्ट. मात्र अशावेळी फोटो पाहण्यासाठी कुणीतरी आपला मोबाईल घेतो आणि त्याला व्हॉट्सअॅपवर आलेले फोटो, जे केवळ आपल्यासाठी असतात, ते पाहिले जातात. हेच लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपने नवे फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप यूझर्सची प्रायव्हसी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हे फीचर नव्या अपडेटच्या माध्यमातून अँड्रॉईड यूझर्सना मिळणार आहे. फीचर तुमच्या मोबाईलमध्ये अॅक्टिव्हेट झाल्यानंतर, तुम्ही खालीलप्रमाणे 'मीडिया व्हिजिबिलिटी'चा पर्याय सुरु करु शकता :

- कुठल्याही वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटवर जा.
- त्यानंतर उजव्या कोपऱ्यात तीन उभ्या डॉटवर क्लिक करा.
- त्यानंतर व्ह्यू काँटॅक्टवर क्लिक करा.
- तिथे तुम्हाला 'मीडिया व्हिजिबिलिटी'चा पर्याय दिसेल.
- 'मीडिया व्हिजिबिलिटी'वर क्लिक केल्यानंतर गॅलरीत मीडिया दाखवायची की नाही, हे विचारले जाईल.
- तुम्ही डिफॉल्ट येस, येस किंवा नो या तीनपैकी एक पर्याय निवडायचा आहे.