मुंबई : भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात अमेझॉनची पकड घट्ट होत चालली आहे. त्यामुळेच 'वॉलमार्ट' या अमेरिकन रिटेलर कंपनीने भारतीय बाजारपेठेत हातपाय पसरण्याचा चंग बांधला आहे. वॉलमार्टनं फ्लिपकार्ट कंपनीमधील 40 टक्के शेअर्स खरेदी करण्याची तयारी सुरु केल्याची माहिती आहे.
फ्लिपकार्ट कंपनीची किंमत यापूर्वी 12 अब्ज डॉलर्स निश्चित करण्यात आली होती. मात्र जपानच्या सॉफ्ट बँक व्हिजन फंड कंपनीनं फ्लिपकार्टमधील 2.5 अब्ज डॉलर्स किमतीचे 20 टक्के शेअर्स खरेदी करण्याची तयारी दाखवली होती.
ई-कॉमर्स क्षेत्रातील अलिकडच्या काळातील हा सर्वात मोठा व्यवहार ठरण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास अमेरिकेप्रमाणे भारतातही अमेझॉन विरुद्ध वॉलमार्ट हा सामना रंगेल. गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील रिटेल क्षेत्रावर वॉलमार्टची नजर आहे. फ्लिपकार्टचं मिंत्रा, जबाँग, ईबे इंडिया, फोनपे ताब्यात घेण्यासाठी वॉलमार्टचे प्रयत्न आहेत.
वॉलमार्ट-फ्लिपकार्टमधील व्यवहार अद्याप प्राथमिक पातळीवर आहे. दोन्ही कंपनीच्या प्रवक्त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.