Worlds First Text Message :  टेलिकॉम क्षेत्रात वेगाने बदल झाला आहे. काही वर्षांपूर्वी असलेले तंत्रज्ञान मागास वाटावे इतक्या वेगाने तंत्रज्ञान बदलत आहेत. सध्या मेसेसिंग अॅप्समुळे टेक्स्ट मेसेजचा (एसएमएस) वापर खूपच कमी प्रमाणात करण्यात येत आहे. कधीकाळी एसएमएसचा वापर करणे हे काहीसे खर्चिक वाटायचे. जगातील पहिल्या एसएमएसचा लीलाव करण्यात येणार आहे. हा एसएमएस 30 वर्षांपूर्वी पाठवण्यात आला होता. हा एसएमएस फक्त 14 अक्षरांचा आहे. 


जगातील पहिला एसएमएस हा डिसेंबर 1992 मध्ये पाठवण्यात आला होता. हा मेसेज व्होडाफोन कंपनीच्या एका कर्मचाऱ्याच्या व्होडाफोनवर पाठवण्यात आला होता. हा टेक्स्ट मेसेज इंजिनियर नील पापवर्थद्वारे न्यूबरी, बर्कशायरमध्ये रिचर्ड जार्विस यांना पाठवण्यात आला होता. पापवर्थ हे त्यावेळेस टेस्ट इंजिनियर म्हणून व्होडाफोनसाठी शॉर्ट मेसेज सर्व्हिससाठी (एसएमएस) काम करत होते. जगातील पहिला एसएमएस 3 डिसेंबर 1992 रोजी पाठवण्यात आला. हा एसएमएस जार्विसच्या ऑर्बिटल 901 हँडसेटवर पाठवण्यात आला. 


जगातील पहिला एसएमएस काय होता?


जगातील पहिल्या एसएमएसचा लीलाव 21 डिसेंबर रोजी होणार आहे. फ्रान्समध्ये एगट्स ऑक्शन हाऊसद्वारे  (Aguttes Auction House ) लीलाव करण्यात येणार आहे. जगातील पहिल्या एसएमएसमध्ये 14 अक्षरे होती. या मेसेजमध्ये “Merry Christmas” असे नमूद करण्यात आले होते. हा टेक्स्ट एसएमएस क्रिप्टोकरन्सीमध्येदेखील खरेदी करता येऊ शकतो. या एसएमएसचा जवळपास एक कोटी 71 लाख रुपयांना लीलाव होऊ शकतो. 


जगातील पहिल्या एसएमएससाठी लीलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला त्याचे सर्वाधिकार देण्यात येणार आहे. यामध्ये एसएमएस सेंडर आणि रिसिव्हर यांची माहिती असणाऱ्या एका डिजीटल फाइलचा समावेश आहे. जगातील या एसएमएसनंतर पुढील वर्षी नोकियाने एसएमएसचे नोटिफिकेशन देणाऱ्या आवाजासह एसएमएस फिचर्सची सुरुवात केली होती. त्यानंतर संदेशवहनात मोठी क्रांती झाली होती.