मुंबई : रिलायन्स जिओ सिमबाबत सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. मेसेजद्वारे जिओ सिम वापरणाऱ्यांना केवळ दोन दिवसांचं अल्टिमेटम दिलं आहे. व्हायरल मेसेजमुळे लोक संभ्रमात पडले असून निर्णय घेण्यासाठी फक्त दोन दिवसांचाच वेळ दिला आहे.

"जिओ इंटरनेट आणि कॉल सर्व्हिस 18 जानेवारी 2018पर्यंत अपग्रेड करा, अन्यथा तुम्हा जिओ इंटरनेट आणि कॉलिंग सेवा वापरता येणार नाही. तसंच जिओ सिम डिअॅक्टिव्हेटही होऊ शकतं. त्यामुळे आजच जिओ सेवा अपग्रेड करा. 31 मार्च 2017 पर्यंत हायस्पीडने अनलिमिटेड इंटरनेट वापरा, जिओ टीम," असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे.



या मेसेजसोबत एक लिंकही दिली आहे. या लिंकवर क्लिक करुन तुम्ही जिओ सर्व्हिस अपग्रेड करु शकता, असा दावाही केला जात आहे.

या मेसेजच्या सत्यतेसाठी एबीपी न्यूजने पडताळणी केली. http://Upgrade-Jio4G.ml या लिंकवर क्लिक केलं.

स्टेप-1
या लिंकवर क्लिक केल्यास राज्य आणि मोबाईल नंबरसह ई-मेल आयडीचीही माहिती मागितली. एबीपी न्यूजने सगळी माहिती दिली.
स्टेप-2
इथे लिंक व्हॉट्सअॅपवर शेअर करण्यास सांगितलं. यातही एक किंवा दोन नाही तर सुमारे 10 व्हॉट्सअॅप फ्रेण्ड्स किंवा ग्रुपसोबत शेअर करण्यास सांगितलं होतं. असं केलं तरच जिओ सर्व्हिस अपग्रेड होऊ शकते. ही अट पूर्ण करण्यासाठी आम्ही ही स्टेपही फॉलो केली.
स्टेप-3
लिंकच्या अखेरच्या टप्प्यात गेल्यावर This site can’t be reached असा मेसेज आला. म्हणजेच जिओ अपग्रेडची ही लिंक फसवणुकीशिवाय दुसरं काहीही नाही.

यानंतर एबीपी न्यूजने रिलायन्स जिओशी संपर्क केला. या मेसेजबाबत विचारलं असता उत्तर मिळालं की, "हा मेसेज जिओतर्फे पाठवलेला नाही, तसंच ही लिंक जिओची नाही."


त्यामुळे जर तुम्ही जिओ सेवा वापरत असाल तर काळजी करु नका आणि अशा अनोळखी लिंकवर क्लिक करु नका. एबीपी न्यूजच्या पडताळणीत हा व्हायरल मेसेज चुकीचा असल्याचं सिद्ध झालं आहे.