मुंबई: तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का? सुरक्षित म्हणजे, तुमचा मोबाईलचे मर्यादित रेडिएशनपेक्षा जास्त रेडिएशन नाहीत ना? कारण, सध्या सोशल मीडियावर एक मेसेज कमालीचा व्हायरल होतो आहे. या मेसेजमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल फोनचं रेडिएशन सहज मोजण्याचा दावा केला आहे.
अनेक मोबाईल यूजर्स हा मेसेज वाचताक्षणीच, यातील नंबर डायल करुन मोबाईल रेडिएशनची पडताळणी करत आहेत. पण मोबाईल रेडिएशनचे रेड अलर्टचे सत्य काय? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
या मेसेजमध्ये *#07# हा नंबर देण्यात आला आहे, तो तुमच्या मोबाईलवरुन डायल करुन तुम्ही तुमच्या मोबाईलचे रेडिएशन लेव्हल जाणून घेण्याचं आवाहन केलं आहे. जर तुमच्या मोबाईलचं रेडिएशन लेव्हल 2.6 watt/kg पेक्षा कमी असल्यास तुमच्या मोबाईलला कोणताही धोका नाही. मात्र, जर याची लेव्हलपेक्षा अधिक असल्यास, तुम्ही तुमचा फोन तत्काळ बदला. कारण मोबाईल रेडिएशन तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाला नुकसान पोहचवू शकतात.
पण या मेसेजमधून जो दावा करण्यात येतोय, यात कितपत तत्थ आहे. कारण कोणताही नंबर डायल करुन तुमच्या मोबाईलचं रेडिएशन तपासता येऊ शकतं का? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे या मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी आमच्या टीमने इंडियन सेल्यूलर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज मोहिनदरु यांच्याशी संपर्क साधला.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्यावतीने मोबाईल रेडिएशनची मर्यादा तपासण्यासाठी एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हा आदेश सर्वच मोबाईल कंपन्यांसाठी बंधनकारक करण्यात आला आहे. म्हणजे, भारतात ज्या फोनची विक्री होते, ते तुमच्या फोनची रेडिएशन लेव्हल सांगेल. ही लेव्हल जाणून घेतल्याशिवाय कोणत्याही मोबाईलची विक्री होणार नाही. जर असे कोणत्याही कंपनीने केल्यास ते नियमांचे उल्लंघन ठरेल.
तेव्हा एबीपी माझाच्या टीमला हा मेसेज खरा असल्याचे पडताळणीत समोर आलं आहे.