मुंबई : तुम्हाला फेसबुकवर नवीन अकाऊण्ट सुरु करायचं असेल, तर हे अकाऊण्ट आधार क्रमांकाशी जोडणं अनिवार्य असल्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र यामध्ये तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण फेसबुकने दिलं आहे. पीटीआयने यासंदर्भात बातमी दिली आहे.
फेसबुक अकाऊण्ट आधार क्रमांकाशी जोडण्याचा कोणताही विचार नसल्याचं फेसबुकने स्पष्ट केलं आहे. आधारसोबत फेसबुक लिंक करण्याची चाचपणी सुरु असल्याचे मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर फेसबुकने हा खुलासा केला.
आधार कार्डावरील नाव जर एखाद्या फेसबुक यूझरने ठेवलं, तर कुटुंबीय आणि मित्रांना त्याची ओळख पटवणं सोपं जाईल, हा हेतू 'आधार कार्ड चाचपणी'मागे असल्याचं फेसबुकने स्पष्ट केलं.
नव्या यूझर्सना फेसबुकवर साईन अप कसं करावं, याची माहिती देणं, हा चाचणीचा उद्देश असल्याचं फेसबुकने सांगितलं. याचा अर्थ अकाऊण्ट आधार क्रमांकाशी लिंक करण्यात यावा, असा होत नसल्याचं फेसबुकतर्फे सांगण्यात आलं.
आम्ही यूझर्सकडून आधार डेटा गोळा करत नाही, त्याचप्रमाणे साईन अप करताना आधार नाव टाकण्याची आवश्यकताही नाही, असंही फेसबुककडून स्पष्ट करण्यात आलं आहे. फेक अकाऊण्ट्सचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी फेसबुकने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.