नवी दिल्ली : जगातील सर्वात महाग मोबाईल तयार करणाऱ्या लक्झरी वर्टूने नुकताच आपला नवा फोन लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 2.47 मिलियन युआन (चीनचे चलन) म्हणजे भारतीय चलनानुसार, तब्बल 2.3 कोटी रुपये आहे. वर्टूचा हा नवा फीचर फोन लिमिटेड एडिशनमध्ये उपलब्ध असून, कंपनीने याचे नामकरण 'सिग्नेचर कोबरा' असं केलं आहे.
या फोनचे जगभरात केवळ आठच यूनिट लॉन्च करणार असल्याचं, कंपनीनं स्पष्ट केलं आहे. तसेच यातील एक फोन चीनमध्येच विकला जाईल, असंही कंपनीनं सांगितलं आहे.
फ्रान्सचे प्रसिद्ध सराफी ब्राण्ड बाशरोनने या फोनचं डिझाईन बनवलं असून, फोनच्या फ्रंट पॅनेलवर नागाचं डिझाईन तयार केलं आहे. तसेच यामध्ये तब्बल 439 रुबी बसवण्यात आले आहेत.
गिजचायना या वेबसाईटनुसार, या फोनमध्ये 388 भाग आहेत. तसेच हा फोन चीनच्या ई-कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून विक्री होईल.
या फोनच्या खरेदीपूर्वी ग्राहकांना 10 हजार रुपये डाऊन पेमेंट भरण्याची कंपनीने अट घातली आहे. तसेच उर्वरित रक्कम फोनची डिलेव्हरी मिळण्यापूर्वी कंपनीकडे जमा करावी असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे, या फोनची सर्व रक्कम जमा झाल्यावर ग्राहकांना याची डिलेव्हरी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून होणार आहे.