नवी दिल्ली : आधार प्राधिकरण अर्थात UIDAI ने एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँकच्या e-KYC प्रक्रियेवर तात्पुरती बंदी आणली आहे. एअरटेलचा e-KYC परवाना रद्द करण्यात आला आहे. e-KYC चा गैरवापर केल्याचा आरोप एअरटेलवर असल्याने ही कारवाई करण्यात आली.


भारती एअरटेलचा e-KYC परवाना तातडीने निलंबित करण्यात येत आहे, असं e-KYC ने जारी केलेल्या एका आदेशात म्हटलं आहे. UIDAI ने एखाद्या दूरसंचार कंपनीवर एवढी मोठी कारवाई करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.

एअरटेलवर आरोप काय आहे?

सिम रिव्हेयरिफाय करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची परवानगी घेतल्याशिवायच एअरटेलने त्यांचं खातं एअरटेल पेमेंट बँकेत सुरु केलं, असा आरोप आहे. एवढंच नाही, तर पेमेंट बँक खात्याला एलपीजी सबसिडी मिळण्यासाठीही लिंक केलं जात असल्यावर UIDAI ने गंभीर आक्षेप घेतला आहे.

या निर्णयाचा ग्राहकांवर काय परिणाम?

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, सर्व ग्राहकांना त्यांचा मोबाईल नंबर 31 मार्च 2018 पर्यंत आधारशी लिंक करायचा आहे. यासाठी जी e-KYC प्रक्रिया आहे, ती एअरटेलच्या ग्राहकांना करता येणार नाही. केवळ आधार नोंदणी केंद्रावर जाऊनच ही प्रक्रिया करता येईल.

एअरटेलच्या e-KYC वर घालण्यात आलेली ही बंदी कधीपर्यंत राहिल, याबाबत UIDAI ने काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे एअरटेल पेमेंट बँकेच्या ग्राहकांना त्यांचं खातं आधारशी लिंक करण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.