नवी दिल्ली : मोबाईल फोनमध्ये आयफोनचे बरेच मॉडेल महागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने मोबाईल फोनसोबतच टीव्हीवरील आयात शुल्क वाढवलं आहे. ओव्हन आणि वॉटर हिटरवरही याच प्रकारे वाढ करण्यात आली आहे.


अर्थमंत्रालयाने अधिसूचना जारी करत याबाबत माहिती दिली आहे. मोबाईलवर असलेलं आयात शुल्क 10 टक्क्यांहून 15 टक्के करण्यात आलं आहे. हे नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळे आता मोबाईल खरेदी करताना जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

मोबाईल मार्केट क्षेत्रातील संस्था काऊंटरपॉईंटच्या आकडेवारीनुसार, 2017 मध्ये 28 कोटी मोबाईल हँडसेट विकण्याची शक्यता आहे. यापैकी 80 टक्के फोन मेक इन इंडिया आहेत, तर उर्वरित 20 टक्के फोन इतर देशांमधून आयात केलेले आहेत. आयात होणाऱ्या फोनमध्ये अॅपल, मायक्रोमॅक्स आणि लेनोव्होच्या जास्त फोनचा समावेश आहे.

अॅपलचे भारतात विकले जाणारे जवळपास 88 टक्के फोन आयात केले जातात. त्यामुळे अॅपलला एकतर किंमत वाढवावी लागेल, किंवा भारतातच निर्मिती सुरु करावी लागेल. मायक्रोमॅक्स आणि लेनोव्होने भारतात फोन निर्मिती करण्याची तयारी पूर्ण तर केलेली आहे, मात्र प्रत्यक्षात काम सुरु झालेलं नाही. त्यामुळे आता या नव्या निर्णयानंतर दोन्ही कंपन्या उत्पादन सुरु करतील, अशी अपेक्षा आहे.

मोबाईल क्षेत्रामध्ये सध्या सॅमसंगचा दबदबा आहे. सॅमसंगचे सर्व मोबाईल भारतातच तयार होतात. देशात सध्या 50 कोटी मोबाईल तयार होतात. तीन वर्षांपूर्वी हा आकडा 25 कोटी एवढा होता.

टीव्ही महागणार

टीव्ही मार्केटमध्ये सॅमसंग, एलजी आणि सोनीचा दबदबा आहे. मात्र सॅमसंग आणि एलजीवर या निर्णयाचा काहीही परिणाम होणार नाही. कारण या कंपन्यांची सर्व टीव्ही सेट इथेच तयार होतात. सोनीचे टीव्ही आयात होतात, त्यामुळे यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. देशात सध्या वर्षाला 90 लाख टीव्ही सेटची विक्री होते. दरम्यान या निर्णयावर इलेक्ट्रॉनिक कंपन्यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.