Aadhaar Card News: बनावट आधार कार्डवर (Fake Aadhaar Card) चाप घालण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी व्हेरिफिकेशन (पडताळणी) करणे गरजेचं आहे, असे आयटी मंत्रालयानं सांगितलं. आधार कार्ड संदर्भात गुरुवारी UIDAI ने नियमावली जारी केली आहे. यामध्ये आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी संस्थांनी पडताळणी करणं गरजेचं असल्याचं म्हटलेय. 


आधार कार्डची पडताळणी कशी होईल?
UIDAIने जारी केलेल्या नियमावलीत म्हटले की, आधार कार्ड जमा केल्यानंतर त्या व्यक्तीच्या संमतीनंतर आधार क्रमांकाची पडताळणी करावी.  एखाद्या व्यक्तीने सादर केलेल्या कोणत्याही प्रकारच्या आधारचा (आधार कार्ड, ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड, आणि एम-आधार) खरेपणा तपासण्यासाठी योग्य पाऊल आहे. त्यासाठी mAadhaar App, किंवा Aadhaar QR कोड स्कॅनर वापरून सर्व प्रकारच्या आधारची पडताळणी केली जाऊ शकते.  QR कोड स्कॅनर Android आणि iOS आधारित मोबाइल फोनवरील अॅप्लिकेशनसाठी विनामूल्य आहे.


बनावट आधार कार्ड (Fake Aadhaar Card) तयार केल्यास होऊ शकतो दंड -
आधार कार्डची पडताळणी केल्यामुळे अप्रामाणिक आणि असामाजिक घटक कोणत्याही संभाव्य गैरवापरात सहभागी होण्याला आळा बसतो. हे  कोणताही 12-अंकी क्रमांक आधार नाही, या युआयडीएआयच्या भूमिकेचे समर्थन करते. आधार दस्तावेजांची छेडछाड झाली असल्यास ऑफलाइन पडताळणीद्वारे त्याचा शोध घेता येऊ शकतो.  बनावट आधार कार्ड तयार करणे अथवा आधारशी छेडछाड करणे हा गुन्हा आहे.   आधार कायद्याच्या कलम 35 अंतर्गत तो व्यक्ती दंडास पात्र आहे.


UIDAIचे राज्यांना आवश्यक निर्देश 
युआयडीएआयने वापरापूर्वी आधार पडताळणीच्या आवश्यकतेवर  भर देण्याची  राज्य सरकारांना विनंती केली आहे. याबाबत राज्यांना आवश्यक निर्देश देण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून जेव्हा ओळखपत्राचा पुरावा म्हणून  आधार कार्ड सादर केले जाईल - तेव्हा आधार वापरून संबंधित संस्थेद्वारे रहिवाशाचे प्रमाणीकरण/पडताळणी  केली  जाईल. युआयडीएआयने  संस्थाना  प्रमाणीकरण/पडताळणीसाठी  विनंती केली असून तसे अधिकार देणारी परिपत्रके देखील जारी केली आहेत. ज्यात पडताळणीच्या आवश्यकतेवर भर आणि  प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे.


रहिवासी स्वेच्छेने त्यांचे आधार कागद किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करून त्यांची ओळख पटवण्यासाठी  आधार क्रमांक वापरू शकतात. युआयडीएआयने यापूर्वीच रहिवाशांसाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल माहिती प्रसिद्ध केली असून रहिवासी आत्मविश्वासाने त्यांचे आधार वापरू शकतात.