नवी दिल्ली : ओटीपीद्वारे (वन टाईम पासवर्ड) सिम-आधार रिव्हेरिफिकेशन करण्यासाठी आता आधार प्राधिकरणाने (UIDAI) हिरवा झेंडा दाखवला आहे. दूरसंचार कंपन्यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला आधार प्राधिकरणाने मान्यता दिली. त्यामुळे 1 डिसेंबरपासून ओटीपीच्या माध्यमातून सिम रिव्हेरिफिकेशन करता येईल.


दूरसंचार कंपन्यांनी मांडलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. त्याची 1 डिसेंबरपासून अंमलबजावणी होईल, अशी माहिती आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी दिली. ते ‘पीटीआय’शी बोलत होते.

सिम रिव्हेरिफिकेशन प्रोसेस सोपी व्हावी यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना आखण्याचे आदेश सरकारने दूरसंचार कंपन्यांना दिले होते. त्यानुसार कंपन्यांनी आधार प्राधिकरणाला प्रस्ताव दिला होता. ओटीपीमुळे ग्राहकांना त्यांचा मोबाईल नंबर घरबसल्या व्हेरिफाय करता येईल.

ओटीपीने रिव्हेरिफिकेशन कसं होईल?

मोबाईल नंबर आता आधारशी ओटीपी, संबंधित कंपनीचं अॅप किंवा आयव्हीआरएसने लिंक करता येईल. रिव्हेरिफिकेशन प्रोसेस या निर्णयामुळे जलद आणि सोपी होणार आहे. दरम्यान दूरसंचार कंपन्यांच्या स्टोअर्समध्ये जाऊनही ही प्रोसेस करता येईल. मात्र दिव्यांग, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना यामुळे फायदा होईल.

रिव्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2018 ची डेडलाईन देण्यात आली आहे. या निर्णयामुळे डेडलाईन पाळण्यास मदत होईल, असं अजय भूषण पांडे म्हणाले.