Uber Security Breach : ऑनलाईन कॅब बुकींग सर्विस असणाऱ्या उबर (Uber) अ‍ॅपवर सायबर हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. उबर कंपनीने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सायबर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे. उबर कंपनीनं ट्विट करत म्हटलं आहे की, 'उबरवर सायबर हल्ला झाला आहे. आम्ही सध्या एका सायबर हल्ल्याच्या घटनेला सामोरं जात आहोत. सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात आहोत. यासंदर्भात अधिक तपास सुरु असून तुम्हांला पुढील अपडेट देत राहू.' उबर कंपनीनं सांगितलं आहे की, सायबर हल्ला झाल्याचा अहवाल समोर आल्यानंतर कंपनीनं सायबर सुरक्षेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. उबर कंपनीच्या अंतर्गत कम्यनिकेशन सॉफ्टवेअरवर हा सायबर हल्ला झाला आहे. 


'मी हॅकर आहे' 


न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालाचा हवाला देत रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, राईड-हेलिंग कंपनी उबर कंपनीच्या मेसेजिंग अॅपवर (कंपनीमध्ये अंतर्गत संपर्कासाठी असलेलं सॉफ्टवेअर) एक स्लॅक मेसेज आला. हा मेसेज हॅकरकडून पाठवण्यात आला होता. 'मी हॅकर आहे' असा मेसेज हॅकरने कंपनीच्या सॉफ्टवेअरवर पाठवला होता. यामध्ये हॅकरने कंपनीच्या डेटाबेसमध्ये प्रवेश केल्याचा म्हणजेच कंपनीचं सॉफ्टवेअर हॅक करून माहिती चोरल्याचा दावा केला.






उबेर कंपनीच्या सॉफ्टवेअरवर गुरुवारी हल्ला झाला. त्यामुळे कंपनीच्या अंतर्गत संपर्क आणि ऑनलाईन सेवेवर परिणाम झाला आहे. कंपनीकडून सायबर सुरक्षेशी संबंधित या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, या सायबर सुरक्षेच्या उल्लंघनामुळे उबेरला आपली अंतर्गत कम्युनिकेशन सिस्टिम बंद करावी लागली आहे. रिपोर्टच्या मते, हा हॅकर 18 वर्षीय तरुण असल्याची शक्यता आहे.