नागपूर : राज्यात टंकलेखनाचा खडखडात इतिहास जमा होणार असून आजपासून सुरु झालेली पाच दिवसीय टंकलेखन परिक्षा ही आता राज्यातील शेवटची परीक्षा आहे. टंकलेखनाच्या शेवटच्या परीक्षेसाठी राज्यभरातून ३ लाख ५० हजार विद्यार्थी बसले आहेत.


 

राज्यात आजपासून टंकलेखन परीक्षा सुरु झाली. मात्र, पाच दिवस चालणारी ही टायपिंग परीक्षा शेवटची ठरणार आहे. यानंतर टंकलेखन यंत्रावरील परिक्षा कायमची बंद होणार आहे.  यानंतर ही परीक्षा अधुनिक युगाला अनुरूप अशी संगणकावर घेण्यात येणार आहे.

 

टंकलेखन बंद आणि संगणक परीक्षा सुरु हा निर्णय खरंतर २०१५ याच वर्षी अंमलात आला असता. मात्र, टंकलेखन प्रशिक्षण संस्थांच्या मागणीवरून याला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली, असल्याची माहिती नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सतीश मेंढे यांना दिली.

 

राज्य परीक्षा परिषदेतर्फे १७ एप्रिल २०१६ रोजी प्रायोगिक तत्वावर टंकलेखनाची ऑनलाइन परीक्षा झाली.  ती जास्त पारदर्शक सुद्धा असल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता.  सध्या जी टंकलेखन परीक्षा होते, त्यात पारदर्शकता नाही हाच सर्वात मोठा आरोप होत होता.  त्यामुळे विद्यार्थी जरी जास्त पास होत असले, तरीही मौक्रीसाठी परिक्षा देताना अनेक अयोग्यच ठरतात.  त्यामुळे काही प्रशिक्षण संस्था आणि मंडळी ही या टंकलेखनाच्या परीक्षेला अजून मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र शासकिय अध्यादेशाप्रमाणे ह्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.