नवी दिल्ली: सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणावरून मोठी चर्चा रंगली आहे. पाकिस्तानच्या बलोच नेत्यांनी मोदींच्या भाषणाची प्रशंसा करून प्रतिक्रीया व्यक्त केल्या. मात्र, दुसरीकडे ट्विटरवर वेगळीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या चर्चेत काही पक्षाच्या राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे. या चर्चेचा केंद्रबिंदू पंतप्रधानांच्या भाषणावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांची कथित डुलकी ठरला आहे. एका पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झोपी गेल्याचे सांगितले, तर दुसऱ्या नेत्याने केंद्रातील अशाच एका नेत्याचा झोपेच्या डुलकीवेळचा फोटो शेअर केला आहे.

 


वास्तविक, पंतप्रधानांच्या भाषणावेळी अनेक निमंत्रित व्यक्ती डोळे बंद करून बसलेले पाहायला मिळाले. यामधीलच दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचाही असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमधून पंतप्रधानांच्या भाषणावेळी केजरीवाल झोपी गेल्याचा दावा करण्यात आला होता. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच, अनेकांनी त्यावर प्रतिक्रीयाही व्यक्त केल्या.

 



 

हा फोटो व्हायरल झाल्याने आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनीही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा असाच एक फोटो ट्विट केला. या फोटोत अरुण जेटलींना मार्क करून अरुण जेटलीही डुलक्या घेत असल्याचा दावा केला. मात्र, यावर कोणीही चर्चा केली नाही. यासोबतच काही इतर नेत्यांचे असेच फोटो सोशल मीडियावर ट्रॉल होत आहेत.