मुंबई : यवतमाळमध्ये 92 व्या. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे ट्विटरवरही साहित्याचा मेळा जमला आहे. 11 ते 13 जानेवारी या कालावधीत 'चौथ्या ट्विटर मराठी भाषा संमेलन 2019' चं आयोजन करण्यात आलं आहे.
मराठीचे ट्विटरविश्व अधिकाधिक फुलावं आणि मराठीत रोज भरपूर ट्वीट्स लिहिले जावेत, याच ध्येयातून #ट्विटरसंमेलन या कल्पनेचा जन्म झाला. तीन दिवस वेगवेगळ्या हॅशटॅगचा वापर करुन ट्विटराईट्स या संमेलनामध्ये सहभागी होऊ शकतात. संमेलनाबद्दल @MarathiWord या ट्विटर अकाऊण्टवर अधिक माहिती आहे.
संमेलनाचा मुख्य हॅशटॅग #ट्विटरसंमेलन असेल. याशिवाय बारा हॅशटॅग पैकी एक निवडून तुम्ही ट्वीट करु शकता. कविता, ब्लॉग, कथा, छंद अशा विविध गोष्टींविषयी ट्वीट शेअर करण्यास सांगण्यात आलं आहे.
कोणकोणते हॅशटॅग
#माझीकविता
#ट्विटकथा
#माझाब्लॉग
#माझीबोली
#साहित्यसंमेलन
#वाचनीय
#हायटेकमराठी
#बोलतोमराठी
#मराठीशाळा
#भटकंती
#खमंग
#माझेवेड
गेली तीन वर्ष ट्विटर संमेलनाला मराठी यूझर्सकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. भारतासह परदेशातील मराठी ट्विटर यूझर्सनी ट्विटर संमेलनात सक्रीय सहभाग नोंदवला होता.