नवी दिल्ली : तुमचं मोबाईल बिल 1 ऑक्टोबर 2017 पासून आणखी स्वस्त होणार आहे. कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने मोबाईल टू मोबाईल कॉलसाठी आययूसी म्हणजेच इंटरकनेक्शन चार्ज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

1 ऑक्टोबर 2017 पासून 14 पैसे प्रती मिनिटांऐवजी 6 पैसे प्रती मिनिट आययूसी वसूल केला जाईल. रिलायन्स जिओ वगळता इतर कंपन्यांनी आययूसी वाढवण्याची मागणी केली होती. मात्र ट्रायने सर्व कंपन्यांना दणका देत ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

इतर कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल जोडण्यासाठी आययूसी द्यावा लागतो. हा चार्ज सध्या 14 पैसे होता. मात्र आयडिया, एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांनी हा चार्ज वाढवण्याची मागणी केली होती. तर रिलायन्स जिओने हा चार्ज बंद करण्याची मागणी केली होती.

ट्रायच्या या निर्णयाचा फायदा थेट जिओला होण्याची शक्यता आहे. कारण जिओच्या नेटवर्कवरुन एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोनवर मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग कॉल केले जातात. त्यामुळे जिओचा आता आययूसी खर्च कमी होणार आहे.

आययूसीची सुरुवात 2003 साली करण्यात आली. इनकमिंग कॉल फ्री झाल्यानंतर ट्रायने कॉल करणाऱ्या ऑपरेटरकडून चार्ज वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला हा चार्ज 15 पैसे प्रती मिनिट ते 50 पैसे प्रती मिनिट होता. ट्रायने 2004 साली हा दर घटवून 20 पैसे प्रती मिनिट केला, तर 2015 मध्ये हा दर 14 पैसे प्रती मिनिट करण्यात आला होता.