मुंबई: रिलायन्स जिओचा 4G VoLTE फीचर फोनची मागील अनेक दिवसांपासून बरीच चर्चा सुरु होती. आता पुन्हा एकदा या स्मार्टफोनबाबत नवी चर्चा सुरु झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जिओचा हा फोन लवकरच लाँच होणार असून याची किंमत फक्त 500 रुपये असेल असा दावा करण्यात येत आहे.


इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, रिलायन्स जिओचा 4G VoLTE फीचर फोन 500 रुपये किंमतीला बाजारात उपलब्ध असेल. HSBC टेलीकॉमच्या अॅनालिस्ट राजीव शर्मा यांनी सांगितलं की, 'जिओ आपला फीचर फोन 500 रुपयात लाँच करु शकतं.' 2जी ग्राहकांना 4जी फोन वापरता यावा यासाठी हा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, 4G VoLTE स्मार्टफोनच्या मॉडेलची मोठ्या प्रमाणात ऑर्डर एका चीनी कंपनीला देण्यात आली आहे. जुलै महिन्यापर्यंत हे स्मार्टफोन तयार होतील असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. पण याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही.

मायक्रोमॅक्सं आणि लावाने नुकतेच 4जी कनेक्टीव्हिटी असणारे बजेट स्मार्टफोन लाँच केले पण त्यांच्या किंमतीही 3000 रुपयांपर्यंत आहेत. अशावेळी 500 रुपयांचा स्मार्टफोन बाजारात आल्यास अनेक मोबाइल कंपन्यांनां मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे.