मुंबई : लैंगिक शोषणाविरोधात ट्विटर, फेसबुक यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर आवाज उठवण्यासाठी जगभरात सध्या #MeToo कॅम्पेन सुरु आहे. हॉलिवूड अभिनेत्री अलिसा मिलानोने सुरु केलेल्या #MeToo अभियानाअंतर्गत जगभरातील महिला त्यांच्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटना सांगत आहेत.


हॉलिवूड अभिनेत्रीचं आवाहन
अलिसा मिलानोने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराचा खुलासा करताना जगभरातील महिलांना आवाहन केलं होतं की, त्यांनीही अशाप्रकारच्या घटनांबाबत मोकळेपणाने सांगावं. जेणेकरुन ही छोटी किंवा दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही, हे सगळ्यांना कळेल.

https://twitter.com/Alyssa_Milano/status/919659438700670976

#MeToo ट्विटरवर टॉप ट्रेण्डिंग
यानंतर महिलांसोबत घडणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत जगभरात चर्चा सुरु झाली आहे. कधी ना कधी अशाप्रकारच्या प्रसंगांना सामोरं गेलेल्या महिला #MeToo ह्या हॅशटॅगद्वारे त्यांची कहाणी ट्विटरवर शेअर करत आहेत. #MeToo ट्विटरवर टॉप ट्रेण्डिंगमध्ये आहे. आतापर्यंत सुमारे 30 हजार महिला या हॅशटॅगशी जोडल्या गेल्या आहेत. काही पुरुषांनीही यावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे. हजारो लोकांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हा हॅशटॅग वापरुन आपली कमेंट लिहिली आहे.



#MeToo सुरु करण्यामागचं कारण काय?
हॉलिवूडचे निर्माते हार्वी वाईनस्टीन यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. जगभरातून टीका झाल्यानंतर त्यांची ऑस्कर बोर्डावरुन हकालपट्टी झाली. हार्वींच्या अनेक चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. हार्वी यां हॉलिवूडमध्ये मोठं स्थान असल्याने अनेक अभिनेत्री त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी घाबरत होत्या. परंतु आता अनेकींनी पुढे येऊन तक्रारी दाखल केल्या आहेत.



यानंतर लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर विषयाकडे जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सोशल मीडियावर #MeToo हा हॅशटॅगद्वारे अभियान सुरु करण्यात आलं आहे, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.