टाटा स्काय या डिश सेवा पुरवणाऱ्या कंपनीने 'रुम टिव्ही सर्विस' ही नवी सेवा लाँच केली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने 15 जून पासून 'मल्टी टिव्ही कनेक्शन प्लान' बंद करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर घरातील एका पेक्षा जास्त टिव्हीसाठी यापूढे अधिक पैसे मोजावे लागतील असा अंदाज लावला जात होता. मात्र कंपनीची ही नवी सेवा  एका पेक्षा जास्त टिव्ही असणाऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. यापूर्वी टाटा स्कायच्या 'मल्टी टिव्ही कनेक्शन प्लान'मध्ये एका पेक्षा जास्त टिव्ही कनेक्शन असणाऱ्यांसाठी सवलती देण्यात येत होत्या. आता 'रुम टिव्ही सर्विस' या नवीन सेवेच्या माध्यमातून एका पेक्षा जास्त टिव्ही असणाऱ्यांसाठी टाटा स्कायचे कनेक्शन घेताना प्रत्येक टिव्ही कनेक्शनसाठी आपल्या आवडीचे चॅनल निवडता येणार आहे. यामुळे घरात एक पेक्षा जास्त टिव्ही असलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार चॅनल निवडण्याची सुविधा टाटा स्कायने दिली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ट्रायने बदललेल्या नियमानूसार डिटीएच ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनल निवडता येतात. तसेच ग्राहकांनी निवडलेल्या चॅनलसाठीच त्यांना पैसे द्यावे लागतात. टाटा स्कायच्या या सेवेमुळे एकाच सबस्क्रायबर आयडीवर वेगवेगळ्या कनेक्शनसाठी देखील आवडीनुसार चॅनेल निवडता येणार आहे. कंपनीच्या वेबसाईटद्वारे किंवा मोबाईल अॅपचा वापर करुन प्रत्येक कनेक्शनसाठी चॅनल निवडता येणार आहे.