मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळपास सहा लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक करण्यात आली आहेत. एसबीआयच्या सिस्टीममध्ये सुरक्षेशी निगडीत बग शिरण्याच्या भीतीमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बँकेतर्फे ही पावलं उचलण्यात आली आहेत. कुठलीही पूर्वसूचना न देता कार्ड्स ब्लॉक झाल्याने ग्राहक आश्चर्यचकित झाले होते.
इतर बँकांच्या काही एटीएममध्ये ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीला धोका पोहचवणारे बग म्हणजेच व्हायरस शिरले आहेत. ज्या ग्राहकांनी असे एटीएम वापरले आहेत, त्यांना हा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसबीआयने सव्वासहा लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक केली आहेत. संशयास्पद ट्रान्झॅक्शन्स आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला.
ऐन दिवाळीच्या तोंडावर कुठलीही पूर्वसूचना न देता कार्ड्स अचानक ब्लॉक झाल्यामुळे कार्डहोल्डर हैराण झाले. त्यानंतर बँकेकडून ईमेल आणि एसएमएस पाठवण्यात आले. संबंधित ग्राहकांना नवीन डेबिट कार्ड्स दिली जातील. त्यासाठी आपापल्या ब्रँचमध्ये नव्या कार्डसाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय बँकिंगच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कार्ड रिप्लेसमेंट मानली जात आहे.
0.25 टक्के कार्ड्स ब्लॉक करण्यात आल्याचं एसबीआयचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर शिवकुमार भसीन यांनी म्हटलं आहे. एसबीआयकडून जुलै अखेरपर्यंत 20.27 कोटी डेबिट कार्ड्स जारी करण्यात आली आहेत. यामध्ये एसबीआयच्या सब्सिडरी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रवणकोर आणि स्टेट बँक ऑफ पटियाला यांचा समावेश आहे.