हेलसिन्की (फिनलँड) : रात्री झोपताना स्मार्टफोन चार्जिंगला लावण्याची अनेकांना सवय असते. अनेकजण तर चार्जिंगला लावल्यानंतर स्मार्टफोन आपल्या डोक्याजवळच ठेवतात. जेणेकरुन कॉल आणि मेसेज चेक करता यावेत. मात्र, अनेकदा हे धोकादायक ठरु शकतं. अशीच एक घटना फिनलँडमध्ये घडली आहे.
फिनलँडमधील एक महिला सॅमसंग गॅलक्सी S3 स्मार्टफोन चार्जिंगला लावून झोपली असताना स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाला. धक्कादायक म्हणजे यावेळी महिलेच्या बाजूला तिचा 3 वर्षीय चिमुरडाही झोपला होता. बॅटरीच्या स्फोटानंतर स्मार्टफोनला आग लागली आणि चादर, मॅटरेस जळाल्या.
Yle.fi वेबसाईटच्या माहितीनुसार, या दुर्घटनेच्या काही मिनिटांआधी चिमुरडा स्मार्टफोनसोबत खेळत होता. एका मोठ्या दुर्घटनेतून महिला आण तिचा चिमुरडा बचावला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर महिलेने आतापर्यंत विमा कंपनी किंवा सॅमसंग कंपनीशी संपर्क केला नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या चार्जरने चार्जिंग केल्यास अशाप्रकारची घटना घडण्याची जास्त शक्यता असते किंवा स्मार्टफोन जुना झाला असल्यासही अशा दुर्घटना होतात.