फ्लोरिडा : सॅमसंग गॅलक्सी नोट 7 स्मार्टफोनच्या बॅटरीचे चार्जिंग करताना स्फोट होत असल्याचं वारंवार ऐकायला मिळत होतं. वाढत्या तक्रारींमुळे अखेर कंपनीने जगभरातून स्मार्टफोन परत मागवले. मात्र फ्लोरिडात एका यूझरने खिशातच नोट 7 फोनचा स्फोट झाल्याची तक्रार केली आहे.
जोनाथन स्ट्रॉबेल नावाच्या व्यक्तीने सॅमसंग विरोधात दाखल केलेला खटला कदाचित अमेरिकेतील पहिलंच उदाहरण असल्याचं म्हटलं जात आहे. सॅमसंगने जगभरातून फोन परत मागवल्याच्या दुसऱ्याच दिवशी स्ट्रॉबेलने तक्रार दाखल केली आहे. खिशातच फोनचा स्फोट झाल्याने उजव्या पायाला भाजल्याचं तक्रारकर्त्याने म्हटलं आहे.
सॅमसंग गॅलक्सी नोट 7 स्मार्टफोनच्या बॅटरीचे स्फोट होत असल्याच्या 92 तक्रारी आतापर्यंत अमेरिकेत नोंदवल्या गेल्या होत्या. यामध्ये भाजल्याच्या 26, तर फोनचं नुकसान झाल्याच्या 55 तक्रारी होत्या. खटला दाखल करण्यात आला नव्हता.
सॅमसंग गॅलक्सी नोट 7 च्या बॅटरी चार्जिंग करताना होणाऱ्या स्फोटाची धास्ती भारतीय हवाई वाहतूक मंत्रालयालाही वाटत आहे. चेक इन बॅग्समध्ये गॅलक्सी नोट 7 स्मार्टफोन नेण्यास प्रवाशांना मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विमान प्रवासात हे फोन स्वीच्ड ऑफ ठेवण्याची अटही ठेवण्यात आली आहे.
जगभरातून 2.5 मिलियन म्हणजे 25 लाख ‘गॅलक्सी नोट 7’ फोन परत मागवले जाणार आहेत. त्याऐवजी दुसरे मोबाईल कंपनी ग्राहकांना देणार आहे. सध्या नवीन ‘गॅलक्सी नोट 7’ ची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
फोनच्या निर्मितीदरम्यान झालेली चूक दुरुस्त होण्यास 2 आठवड्यांचा कालावधी लागेल, त्यानंतर वितरकामार्फत नवीन फोन बाजारात आणले जातील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.