नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील जायंट मानल्या जाणाऱ्या अमेझॉन कंपनीने भारतात आपला व्यावसाय वाढवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. अमेझॉन लवकरच भारतात सात नवी गोदामं सुरु करणार आहे. यामधून सुमारे 1200 नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे.
अमेझॉनने याआधीच घोषणा केली आहे की, भारतीय बाजारपेठेत सुमारे 32 हजार 513 कोटींची गुंतवणूक केली जाईल. यामधून ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी 33 डिलिव्हरी स्टेशनची उभारणी केली जाईल.
अमेझॉनने आतापर्यंत भारतात 27 गोदामं सुरु केली आहेत. त्याचबरोबर आणखी गोदामं सुरु केली जाणार आहेत. 10 राज्यांमध्ये 34 गोदामं अमेझॉनकडून येत्या काळात सुरु केली जातील.
गोदामं आणि एक्स्क्लुझिव्ह डिलिव्हरी स्टेशन सुरु करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. यामार्फत ग्राहकांना विश्वासनीय आणि वेगवान सेवा देऊ, असे अमेझॉन इंडियाच्या अखिल सक्सेना यांनी सांगितले.
सात नव्या गोदांमांपैकी दोन गोदामं सध्या सुरु असलेल्या गोदामांमध्येच म्हणजेच मुंबई आणि गुरुग्राममध्येच असतील. एसी, एअर कूलर, फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही इत्यादी मोठे प्रॉडक्ट्स या नव्या गोदांमांमध्ये ठेवले जातील.
येत्या काळात 20 शहरांमध्ये 33 नवे डिलिव्हरी स्टेशनही सुरु केले जातील. जेणेकरुन मोठे प्रॉडक्ट्स ऑर्डरच्या दुसऱ्याच दिवशी डिलिव्हरी केली जाईल.
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्समधील जायंट फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या दोन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी अमेझॉन इंडियाचे सात नवी गोदामं नक्कीच महत्त्वाची ठरणार आहेत.