मुंबई : रिलायन्स जिओने सरासरी मासिक डेटा स्पीडमध्ये जुलैमध्ये बाजी मारत अव्वल क्रमांक मिळवला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. जिओने मंगळवारी देशभरातील व्यावसायिक सेवेला एक वर्ष पूर्ण केलं.


सरासरी डेटा स्पीडमध्ये ट्रायच्या यादीत जिओ गेल्या सात महिन्यांपासून अव्वल क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्या पिछाडीवर आहेत.

जिओचं डाऊनलोडिंग स्पीड जुलैमध्ये 18.331 Mbps होतं, तर एअरटेल 9.266 Mbps, आयडिया 8.883 Mbps आणि व्होडाफोनचं डाऊनलोडिंग स्पीड 9.325 Mbps एवढं होतं.

जिओने मोफत व्हॉईस कॉलिंग आणि मोफत अनलिमिटेड डेटासह दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. VoLTE सेवा देणारी जिओ देशातील एकमेव कंपनी आहे. सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या देशांच्या यादीत भारत 155 व्या स्थानाहून पहिल्या स्थानावर आला आहे.

जिओ येण्यापूर्वी भारतात महिन्याला 20 कोटी GB डेटा वापरला जायचा. हा आकडा आता 150 कोटी GB झाला आहे. ज्यापैकी केवळ जिओचे ग्राहकच 125 कोटी GB डेटा वापरतात.

देशातील 75 टक्के लोकांकडे जिओ नेटवर्क असल्याचा दावा कंपनीने केला आहे. येत्या एका वर्षात 99 टक्के लोकांकडे जिओ असेल, असंही कंपनीने म्हटलं आहे. जिओने सर्वात वेगाने ग्राहक जोडण्याचाही विक्रम केला. कंपनीने लाँचिंगनंतर 170 दिवसात प्रत्येक सेकंदाला 7 ग्राहक जोडून फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअप यांचाही विक्रम मोडला.