मुंबई : रिलायन्स जिओच्या अंदाजे 90 टक्के ग्राहकांनी प्राईम मेंबरशिप घेतली आहे. मोफत सेवा संपल्यानंतर रिलायन्सने प्राईम मेंबरशिपची ऑफर दिली होती. अमेरिका मेरिल लिंचच्या अहवालातून ही गोष्ट समोर आली आहे.
प्राईम मेंबरशिप ऑफर नसतानाही 76 टक्के ग्राहक जिओची सेवा कायम ठेवतील, असंही या अहवालात म्हटलं आहे. जिओच्या 80 टक्के ग्राहकांकडे एकच सिम आहे. यामध्ये 90 टक्के ग्राहकांकडे प्राईम मेंबरशिप आहे. 303 रुपये आणि 309 रुपयांच्या प्लॅनचा सर्वाधिक वापर करण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे.
विशेष म्हणजे या अहवालाच्या अभ्यासादरम्यान ज्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं, त्यापैकी केवळ 5 टक्के ग्राहकांकडे रिलायन्स लाइफ स्मार्टफोन आहे. तर 40 टक्के ग्राहकांकडे सॅमसंग आणि 7 टक्के ग्राहकांकडे आयफोन असल्याचं अभ्यासातून समोर आलं.
जून महिन्यात हे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आलं आणि यामध्ये 1 हजार ग्राहकांनी सहभाग घेतला. सर्वेक्षणातील ग्राहक संपूर्ण बाजारातील नाही, तर मध्यम आणि उच्च श्रेणीतील ग्राहक आहेत.
दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात 'ट्राय'च्या आकडेवारीनुसार 5 सप्टेंबर 2016 रोजी बाजारात पाऊल ठेवणाऱ्या जिओने या वर्षातील एप्रिल अखेरपर्यंत 11.2 कोटी ग्राहक मिळवले आहेत. एवढ्या वेगाने 10 कोटींपेक्षा जास्त ग्राहक जोडण्याचा विक्रम रिलायन्सने केला आहे.