मुंबई : रिलायन्सने जिओ 4G सेवा लाँच करुन आज एक वर्ष पूर्ण झालं. या एका वर्षाच्या काळात भारतामध्ये 4G सेवेत क्रांतीकारी बदल दिसून आला. जिओच्या सेवेनंतर डेटा दरांमध्ये कपात करण्याची दूरसंचार कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली. तर मोफत सेवा देऊन जिओने सर्वात वेगाने ग्राहक मिळवण्याचा विक्रमही केला.

जिओपूर्वी भारतात डेटाचा विचार एमबीमध्ये केला जायचा. मात्र आज जिओ युझर्स जीबीमध्ये डेटाचा विचार करतात. मोबाईल इंटरनेट डेटाच्या बाबतीत भारताचा जगात 155 वा क्रमांक होता. तर भारत आता सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या देशांच्या यादीत अव्वल स्थानी आहे.

जिओ येण्यापूर्वी भारतात महिन्याला 20 कोटी GB डेटा वापरला जायचा. हा आकडा आता 150 कोटी GB झाला आहे. ज्यापैकी केवळ जिओचे ग्राहकच 125 कोटी GB डेटा वापरतात.

जिओवर एका महिन्याला 165 कोटी तास व्हिडिओ स्ट्रिमिंग केली जाते. तर 250 कोटी मिनिट व्हॉईस कॉलिंगसाठी प्रती दिन वापरली जातात. VoLTE सेवा देणारी जिओ पहिलीच कंपनी ठरली. अजूनपर्यंत एकाही दूरसंचार कंपनीने ग्राहकांना ही सेवा दिलेली नाही.

देशातील 75 टक्के लोकांकडे जिओ नेटवर्क असल्याचा दावा कंपनीने केला आहे. येत्या एका वर्षात 99 टक्के लोकांकडे जिओ असेल, असंही कंपनीने म्हटलं आहे. जिओने सर्वात वेगाने ग्राहक जोडण्याचाही विक्रम केला. कंपनीने लाँचिंगनंतर 170 दिवसात प्रत्येक सेकंदाला 7 ग्राहक जोडून फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअप यांचाही विक्रम मोडला.

मोफत जिओ फोन

जिओने दूरसंचार कंपन्यांची झोप उडवल्यानंतर आता थेट मोफत 4G फीचर फोन देण्याची घोषणा केली. 15 ऑगस्ट रोजी हा फोन लाँच करण्यात आला. तर 24 ऑगस्ट रोजी या फोनसाठी प्री बुकिंग सुरु करण्यात आली. दरम्यान जास्त प्रतिसाद मिळाल्याने ही प्री बुकिंग दोन दिवसातच बंद करावी लागली. एका दिवसात 60 लाख ग्राहकांनी जिओ फोन बुक केला आहे.

जिओ फोनची किंमत शून्य रुपये असली तरीही 1500 रुपये अनामत रक्कम म्हणून द्यावी लागणार आहे. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील. या फोनला महिन्याला 153 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर यामध्ये अनलिमिटेड डेटा आणि व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे.

4G फोनमध्ये झपाट्याने वाढ

जिओ सिम वापरण्यासाठी 4G फोन असणं आवश्यक आहे. जिओने एका वर्षात 12 कोटींहून अधिक ग्राहक जोडले आहेत. 2015 च्या पहिल्या तिमाहीत स्मार्टफोन बाजारात 3G फोनची भागीदारी 73 टक्के, 2G फोनची भागीदारी 23 टक्के होती. मात्र 2017 च्या पहिल्या तिमाहीत 95 टक्के लोकांकडे 4G फोन आहे. तर केवळ 5 टक्के लोकांकडे 3G आणि 2G फोन आहे. म्हणजेच 2017 मध्ये 4G ग्राहकांची संख्या तीन पटीने वाढली आहे.

फायबर टू द होम

डिजीटल इंडियासाठी जिओचा पुढचा मेगा प्लॅन FTTH म्हणजेच ‘फायबर टू द होम’ असणार आहे. मोबाईल डेटा क्षेत्रात जम बसवल्यानंतर घरगुती आणि कार्यालयीन इंटरनेटला वेग देण्यासाठी जिओची ही सेवा 100 Mbps स्पीडचं नेटवर्क देणार आहे. या ब्रॉडबँडच्या लाँचिंग प्लॅनमध्येही अनेक अशा ऑफर असू शकतात ज्या जुनं नेटवर्क सोडून जिओ घेण्यासाठी भाग पाडतील. सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आयडिया आणि BSNL ब्रॉडबँड कनेक्शनचं जाळं आहे. मात्र यांचं स्पीड आणि डेटा दर पाहून जिओ ग्रामीण भागाच्या डिजीटल क्रांतीची नांदी ठरणार आहे.