नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या 4G इंटरनेट सेवेच्या माध्यमातून इतर टेलिकॉम कंपन्यांना धडकी भरवल्यानंतर, आता स्मार्टफोन मेकर कंपन्यांनाही धडकी भरवण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनी कमी किंमतीत 4G स्मार्टफोन आणणार आहे. या फोनमध्ये 4G-VoLTE तंत्रज्ञान असेल. या फोनची किंमत 1500 रुपयांपेक्षाही कमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलायन्स जिओ इन्फोकॉमने फ्री अनलिमिटेड इंटरनेट डेटा आणि मोबाईल कॉलिंगची सुविधा अत्यंत लोकप्रिय ठरली होती आणि अजूनही लोकप्रिय ठरते आहे. जिओची सुविधा 31 डिसेंबर 2016 पासून आणखी तीन महिने वाढवून 31 मार्च 2017 पर्यंच वाढवण्यात आली आहे.

जिओच्या माध्यमातून टेलिकॉम क्षेत्रात धडाकेबाज एन्ट्री केल्यानंतर आता स्मार्टफोन बाजारातही दमदार एन्ट्री करण्याच्या विचारात रिलायन्स जिओ इन्फोकॉम असल्याचे दिसते आहे.

काही अंदाजे आकडेवारीनुसार, भारतात आजही 65 टक्के लोक फीचर फोनचा वापर करतात. त्यामुळे रिलायन्सने 1500 रुपयांहून कमी किंमतीचा स्मार्टफोन आणला, तर नक्कीच स्मार्टफोन बाजारात जिओसारखीच क्रांती होईल आणि इतर स्मार्टफोन मेकर कंपन्यांना धडकी भरेल.

2017 च्या या पहिल्या तीन महिन्यातच रिलायन्स जिओ इन्फोकॉम आपला कमी किंमतीचा स्मार्टफोन बाजारात उतरवू शकते. या फोनमध्ये फ्रंट आणि रिअर कॅमेरा, लाईव्ह टीव्ही, जिओ चॅट अशा सुविधा असतील, अशी चर्चा आहे.