नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या आणि रिलायन्स जिओ यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. कारण मोबाईल रिचार्ज करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत जुन्या 500 च्या नोटा स्वीकारण्याच्या निर्णयावर रिलायन्स जिओने आक्षेप घेतला आहे.
या निर्णयामुळे खाजगी स्तरावर गैरप्रकार होऊ शकतात. शिवाय मनी लाँडरिंग सारखे प्रकार होऊ शकतात, असं जिओने म्हटलं आहे.
सीओएआय म्हणजेच सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियासमोर जिओने आपलं मत मांडलं. मात्र सीओएआयच्या सदस्यांनी जिओची ही शक्यता नाकारली आहे. सीओएआयमध्ये आयडिया, एअरटेल, व्होडाफोनचा समावेश आहे.
सरकारने ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सीओएआयचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी म्हटलं आहे. तसंच कंपन्यांकडून कोणताही याद्वारे कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, अशी माहिती सीओएआयने दिली आहे.