मुंबई : सरकारच्या जवळपास सर्व योजनांच्या लाभांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. सोबतच बँक, आयकर रिटर्न यांसाठीही आधार कार्ड अत्यावश्यक आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे.

आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असण्याचे अनेक फायदे आहेत. आधार कार्ड असल्यास तुम्ही आयकर रिटर्न ऑनलाईन व्हेरिफाय करु शकता. मात्र त्यासाठी ओटीपीची गरज (वन टाईम पासवर्ड) असते. हा ओटीपी तुमच्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर येतो. शिवाय ई-आधार डाऊनलोड करतानाही तुम्हाला ओटीपीची गरज लागते. मात्र मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल, तर ओटीपी न मिळाल्यामुळे ही महत्त्वाची कामं रखडतात.

मोबाईल नंबर आधारशी लिंक कसा कराल?

दोन परिस्थितींमध्ये तुम्हाला आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करावा लागेल. एक म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करत असाल. किंवा तुमचा बदललेला मोबाईल नंबर आधार डेटामध्ये अपडेट करायचा असेल.

पहिल्यांदाच मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी...

तुम्हाला पहिल्यांदाच मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करायचा असेल तर ऑफलाईनच करावा लागेल. कारण बहुतांश ऑनलाईन व्यवहारांसाठी ओटीपीची गरज असते आणि तो तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवला जातो. इथे तुमचा मोबाईल नंबर तुम्ही पहिल्यांदाच लिंक करत असल्यामुळे ओटीपी पाठवला जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला जवळच्या आधार नोंदणी केंद्रामध्ये जाऊनच मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करावा लागेल.

आधार अपडेट किंवा करेक्शन फॉर्म घेऊन जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या (फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा). फॉर्म अचूकपणे भरा आणि त्यावर मोबाईल नंबर अपडेट करत असल्याचा उल्लेख करा. फॉर्म जमा करण्यासाठी आधार कार्डची फोटो कॉपी आणि ओळखपत्र (मतदान कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट) लागेल. (कोणती कागदपत्र लागतील ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा)

आधार नोंदणी केंद्रामध्ये फॉर्म दिल्यानंतर बोटांच्या ठशांनी (बायोमेट्रिक्स) व्हेरिफिकेशन केलं जाईल. या सर्व प्रक्रियेसाठी 2 ते 5 दिवस लागतात. मात्र UIDAI च्या हेल्पलाईनच्या मते यासाठी जास्तीत जास्त दहा दिवसही लागू शकतात.

मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी...

आधार कार्ड डेटामध्ये तुमचा मोबाईल नंबर ऑनलाईनही अपडेट करता येईल. तुमचा जुना नंबर चालू असेल तर नवीन नंबर ऑनलाईन लिंक करु शकता. मात्र जुना नंबर (जो बदलायचा आहे) बंद असेल तर ऑनलाईन अपडेट करता येणार नाही. कारण त्यासाठी लागणारा ओटीपी पहिल्यांदा लिंक केलेल्या नंबरवर पाठवला जाईल.



https://uidai.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर आधार अपडेट टॅब दिसेल. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाका, त्यानंतर ओटीपी मागवण्याच्या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या अगोदरपासून लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर हा ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी टाकल्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला काय अपडेट करायची आहे, त्याचे पर्याय दिसतील. यामध्ये अपडेट मोबाईल नंबर हा पर्याय निवडा. त्यामध्ये तुमचा नवीन (जो लिंक करायचा असेल तो) मोबाईल नंबर टाका आणि सबमिट करा.