6G Technology : देशभरात ऑक्टोबरपासून 5जी (5G) सेवा सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नेटवर्कच्या नव्या जनरेशनची घोषणा केली आहे. 2030पर्यंत भारतात 6जी (6G) सेवा सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ (Smart India Hackathon 2022) या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी ही मोठी घोषणा केली आहे. 5जी सेवा देशभरात सगळीकडे पोहोचण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं. ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन 2022’मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली.


या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘कृषी आणि आरोग्य क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील तरुण मंडळी नवीन उपक्रमांवर काम करू शकतात. या दशकाच्या अखेरपर्यंत देशात 6G  लाँच करण्याची तयारी करत आहोत. सरकार गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये भारतीय पर्यायांना प्रोत्साहन देत आहे. सरकार जी गुंतवणूक करत आहे, त्याचा सर्व तरुणांनी लाभ घ्यावा.’


संशोधकांनी नवीन उपाय शोधावे!


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, दिवसेंदिवस वाढत चाललेली नवी क्षेत्र आणि नवी आव्हानं पाहता आता नव्या संशोधनाची गरज भासू लागली आहे. त्यांनी संशोधकांना कृषी क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणण्यासाठी संशोधन करण्याचे आवाहन केले आहे. भारतात ऑक्टोबर महिन्यापर्यंत 5जी सेवा कार्यान्वित होईल. ही सेवा स्वस्त आणि सुकर असेल, असा दावा सरकारने केला आहे. त्यांनी तरुण संशोधकांना प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर, 5G लाँच आणि गेमिंग इकोसिस्टमला चालना देण्यासारख्या उपक्रमांचा पूर्ण लाभ घेण्यास सांगितले.


जगभरात संशोधन सुरु


सध्या जगात 6जी तंत्रज्ञानावर भरपूर संशोधन सुरु आहे. जागतिक स्तरावर नोकिया, सॅमसंग इत्यादींसह अनेक कंपन्या 6G सेवेसाठी संशोधन करत आहेत. या सुपरफास्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी भारतात सुरू असलेली तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या संबोधनातून दिसून येते.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या 7-8 वर्षांत देश अनेक नव्या क्रांतीच्या माध्यमातून वेगाने प्रगती करत आहे. आजघडीला देशात डिजिटल क्रांती होत आहे. भारतात पायाभूत सुविधामध्ये क्रांती होत आहे, आरोग्य क्षेत्रात क्रांती होत आहे. याचबरोबर तंत्रज्ञान क्षेत्रातही क्रांती होत आहे. आता प्रत्येक क्षेत्रातात आधुनिकीकरण करण्याकडे लक्ष दिले जात असल्याचे, पंतप्रधान मोदी म्हणाले.


संबंधित बातमी: 


6G नेटवर्क येतंय, 5G पेक्षा जास्त असेल इंटरनेट स्पीड; जाणून घ्या काय होणार फायदे


6G मध्ये मिळणार 5G पेक्षा 100 पट जास्त वेग, 142 तासांचा व्हिडीओ काही सेकंदात होईल डाउनलोड