मुंबई : फेसबुक आणि ट्विटरच्या आधी भारतात ऑर्कुटचा बोलबाला होता. मात्र फेसबुक आल्यानंतर सारेजण फेसबुककडे वळले आणि ऑर्कुट मागे पडलं. कालांतराने ऑर्कुट बंदच करण्यात आले. मात्र ऑर्कटचं नवं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘हॅलो’ सुरु झाले आहे.

ऑर्कुटच्या संस्थापक कंपनीनेच ‘हॅलो’ लॉन्च केले आहे. फेसबुकच्या डेटा लीक प्रकरणामुळे आधीच फेसबुक युजर्समध्ये काहीशी नाराजी आहे. याचा फायदा ‘हॅलो’ला होण्याची शक्यता वाढली आहे.

कधीकाळी भारत आणि ब्रिटनमध्ये ऑर्कुट मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होतं. मात्र 2014 साली ऑर्कुटने आपलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद केले. कारण फेसबुकच्या आगमनानंतर ऑर्कुटची लोकप्रियता पार घटली होती.


सोशल मीडियामुळे लोक जवळ येण्याऐवजी एकमेकांपासून दूर जात असल्याचे निष्कर्ष ‘हॅलो’च्या संस्थापकांनी काढला आहे. त्याचसोबत, त्यांनी असा दावा केला आहे की, ‘हॅलो’मुळे लोकांना जवळ आणण्यास मदत होणार आहे. लोकांना एकमेकांशी संवाद साधण्यास आणखी सहज आणि सोपे जाईल, असेही ‘हॅलो’च्या संस्थापकांचे म्हणणे आहे.

2016 साली ब्राझीलमध्ये ‘हॅलो’ची सुरुवात झाली होती. भारतात सध्या बिटा टेस्टिंगमध्ये सुमारे 35 हजार युजर्स जोडण्यात आले आहेत.

ऑर्कुटचा भारतात खूप दबदबा होता. त्यामुळे ऑर्कुटच्या संस्थापक कंपनीचंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ‘हॅलो’ला भारतात कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अॅप स्टोअर किंवा गूगल प्ले स्टोअरमधून युजर्स ‘हॅलो’ अॅप डाऊनलोड करु शकतात.