मुंबई : तुम्ही जर चिनी कंपनीचा मोबाईल वापरत असाल, तर तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे. तुमची वैयक्तिक माहिती थेट चीन सरकार चोरत असल्याची शक्यता आहे. मोदी सरकारला याबाबत शंका आल्यामुळे त्यांनी थेट चिनी कंपन्यांना नोटीस बजावली आहे.


ओप्पो, विवो, शाओमी, जियोनी यासारख्या चिनी मोबाईल कंपन्या भारतात स्मार्टफोन तयार करतात आणि इथेच त्यांची विक्रीही करतात. या कंपन्यांच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांचा डाटा चीन सरकार जमा करत असल्याचा भारताला संशय आहे. भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या डोकलाम वादाचीही याला पार्श्वभूमी आहे.

भारतात विक्री होणारे बहुसंख्य स्मार्टफोन्स हे चिनी कंपन्याकडून तयार केले जातात. यामुळेच चीन सरकार भारतीयांची माहिती हॅक करण्याची भीती भारत सरकारला भेडसावत आहे.

काँटॅक्ट लिस्ट, एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे ओप्पो, विवो, शाओमी, जियोनी यासारख्या चिनी मोबाईल कंपन्यांना सरकारने नोटीस बजावली आहे.