मुंबई : आता राज्यातील नागरिकांना रेशन कार्डसाठी ऑनलाईन अॅप्लिकेशन करता येणार आहे. सध्या राज्य सरकारने मुंबईतील गोरेगाव आणि विक्रोळी भागातील नागरिकांकडून रेशन कार्डसाठी आँनलाईन अर्ज मागिवले असून अर्जदारांना 30 दिवसांत रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर ही सुविधा मुंबई आणि महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे.

 

 

यासंदर्भात माहिती देताना अन्न आणि पुरवठा विभागाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांने सांगितलं की, "सेवा हमी कायद्यानुसार रेशनिंग सेवा आँनलाईन करण्यात येणार असून आम्ही सध्या गोरेगाव आणि विक्रोळी भागातील नागरिकांकडून रेशन कार्डसाठी आँनलाईन अर्ज मागिवणार आहोत. ते इंटरनेटच्या माध्यमातून आँनलाईन अर्ज करु शकतात. त्यानुसार इच्छूकांना आपले सर्व डॉक्यूमेंट स्कॅन करून जोडावे लागणार आहेत. त्यानंतर डॉक्यूमेंट व्हेरीफाय करण्यासाठी आँनलाईन अपॉईंटमेंट दिल्यानंतर डॉक्यूमेंट सादर केल्यास 30 दिवसांत रेशन कार्ड मिळणार आहे. "

 

 

हा अर्ज अन्न आणि पुरवठा विभागाच्या वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारच्या आपलं सरकार या वेब पोर्टल आणि अॅपवरही हा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

 

राज्यात सध्या 1.48 कोटी रेशन कार्डधारक असून यातील 75% ग्रामीण तर 50% शहरी रेशन कार्डधारक आहेत. या सर्वांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक 2013 अंतर्गत अन्न-धान्याचा पुरवठा करण्यात येतो.