मुंबई : पुढच्या वर्षी किमान दोन 5G फ्लॅगशिप फोन येतील, अशी अपेक्षा दूरसंचार उपकरण कंपनी क्वालकॉमचे अध्यक्ष ख्रिश्चियानो अॅमन यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच वनप्लसचे कार्ल पेई यांनी तातडीने घोषणा केली की पुढच्या वर्षी म्हणजेच 2019 मध्ये वनप्लसचा 5G फोन बाजारात येईल.
इंटरनेटच्या पाचव्या पिढीसाठी आता जग सज्ज झालं आहे. भारतानेही यादृष्टीने महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. सरकारी पातळीवर यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असून जगभरातील इतर देशांसोबतच भारतामध्येही पाचव्या पिढीचं हायस्पीड इंटरनेट वापरायला मिळावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
वनप्लसचा जो पाचव्या पिढीच्या इंटरनेटला सपोर्ट करणारा फोन येईल तो स्नॅपड्रॅगनच्या X50 या मॉडेमवर आधारित असेल, असंही कार्ल पेई यांनी कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं. अनेक कंपन्यांनी आपण लवकरात लवकर 5G फोन आणणार असल्याचं जाहीर केलं आहे.
असुस, एचएमडी ग्लोबल (नोकिया फोन बनवणारी कंपनी), एलजी, मोटोरोला, ओप्पो, व्हीवो, शाओमी, सोनी या कंपन्यांनी क्वालकॉमला आश्वासन दिलंय की आम्हीही 5G साठी प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आता पाचव्या पिढीच्या फोनसाठी जास्त प्रतिक्षा करावी लागणार नाही हे स्पष्ट झालंय.
दरम्यान, सॅमसंग आणि अॅपल यांसारख्या कंपन्यांची नावं या यादीत नाहीत. कारण, यांचं स्वतःचं निर्मिती तंत्र आहे. अॅपलही पाचव्या पिढीच्या फोनसाठी प्रयत्नशील असेल. पण कंपनीच्या सध्याच्या दोन चिपमेकर कंपन्यांसोबत असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर यासाठी वेळ लागू शकतो, असं बोललं जात आहे.
वनप्लस 2019 मध्ये जगातील पहिला 5G फोन आणणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Oct 2018 08:40 AM (IST)
वनप्लसने पुढच्या वर्षी पहिला 5G फोन आणण्याची घोषणा केली आहे. यासोबतच इतर कंपन्याही पाचव्या पिढीच्या इंटरनेटला सपोर्ट करणारा फोन आणण्यासाठी प्रयत्नशील असतील.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -