नवी दिल्ली : चीनमधील स्मार्टफोन कंपनी वनप्लस 14 मे रोजी न्यूयॉर्क, लंडन, बीजिंग आणि बंगळुरुमध्ये एकाचवेळी 'वनप्लस 7 सीरिज' स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. वनप्लस 7 मध्ये 90 एचडी डिस्प्ले असू शकतो, अशी माहितीही समोर येत आहे.


या फोनच्या लॉन्चसाठी कंपनीने 'गो बियॉन्ड स्पीड' अशी टॅगलाईन दिली आहे. वनप्लस 7 प्रोचं 5जी व्हर्जनही ही येणार असल्याची माहिती कंपनीने सीईओ पीट लाऊ यांनी दिली. भविष्यातील स्मार्टफोनवरील पडदा आम्ही हटवणार आहोत. या स्मार्टफोनमध्ये टॉप क्लास टेक्नोलॉजीचा समावेश असणार आहे, असंही लाऊ यांनी सांगितलं.


या स्मार्टफोनमध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. अनेक लीक झालेल्या बातम्यांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या स्मार्टफोनचे तीन पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. ज्यामध्ये 'वनप्लस 7', 'वनप्लस 7 प्रो' आणि 'वनप्लस प्रो 5 जी' मॉडेल्सचा समावेश असण्याची शक्यता आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, वनप्लस 7 मध्ये 90 एचडी डिस्प्ले असू शकतो. अॅपलच्या स्मार्टफोन्सना टक्कर देण्याच्या तयारीत वनप्लस दिसत आहे. अॅपलने आयपॅड प्रोमध्ये 120 एचडी डिस्प्ले दिला आहे. नवीन एचडी डिस्प्लेमुळे वनप्लस 7 ची किंमतही जास्त असणार आहे. वनप्लस 7 सीरिजचे फोन सॅमसंग गॅलेक्‍सी एस 10 प्‍लस आणि अॅपल आयफोन एक्‍सएसला पर्याय ठरु शकतात, असं बोललं जात आहे.