मुंबई : वनप्लसने आपल्या युझर्सना ओटीए अपडेट देणं सुरु केलं आहे. ज्यामध्ये वनप्लस 6, वनप्लस 5, 5T, 3, 3T आणि वनप्लस 6 या फोनचा समावेश आहे. अपडेटनंतर अनेक बग फिक्स केले जातील, शिवाय फीचर्समध्येही सुधारणा केली जाईल, असं सांगण्यात येत होतं.
अपडेटनंतर याउलट घडलं आहे. अनेक युझर्सने वनप्लस फॉर्मला तक्रार केली आहे, की अपडेट केल्यानंतर फोनचा बॅटरी बॅकअप कमी झाला आहे. ऑक्सिजन ओएस 5.1.6 आणि 5.1.8 वर फोन अपडेट केल्यानंतर ही बाब समोर आली.
विशेष म्हणजे वनप्लस 6 च्या आलेल्या तक्रारींनुसार फोनमध्ये 50 टक्के बॅटरी शिल्लक असतानाही फोन अचानक बंद होत आहे. चार्जिंगला लावल्यानंतर फोन काम करतो, मात्र यामुळे युझर्सची मोठी अडचण झाली आहे. तर कॅमेरा फ्रिजिंगही पाहायला मिळत आहे.
वनप्लस 6 शिवाय वलप्लस 3 आणि वनप्लस 3 टीमध्येही बॅटरीची तक्रार आहे, जिथे फोन 15 टक्के बॅटरी असतानाही आपोआप बंद होत आहे. वनप्लसने यावर अद्याप तरी कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलं नाही. मात्र येत्या काळात कंपनी बॅटरीबाबत काही तरी निर्णय घेण्याची शक्यता आहे.
वनप्लस 6 हा स्मार्टफोन भारतात मे महिन्यात लाँच करण्यात आला. यामध्ये आयफोन X प्रमाणे नॉच, स्लो-मो, स्नॅपड्रॅगन 845 या सारखे बरेच फीचर देण्यात आले आहेत.
वनप्लस 6 हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये आहे. तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 39,999 रुपये आहे.