नवी दिल्लीः नोकियाचा D1C हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात येणार आहे. या फोनचे काही फीचर्स नुकतेच समोर आले आहेत. ऑगस्टमध्ये नोकियाच्या 5320 आणि नोकिया 1490 या फोन्सला गीकबेंच साईटवर स्पॉट करण्यात आलं होतं. त्यानंतर आता बेंचमार्क साईट गीकबेंचवर या नव्या फोनला स्पॉट करण्यात आलं आहे.


नोकिया D1C हा स्मार्टफोन एक मिडबजेट स्मार्टफोन असणार आहे. गीकबेंचनुसार या फोनमध्ये 1.4GHz प्रोसेसर, 3 जीबी रॅम असणार आहे. शिवाय नोगट 7.0 ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे.

अनेक दिवसांनी नोकियाचं बाजारात कमबॅक होत असल्याने स्मार्टफोन प्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. या फोनच्या निमित्ताने नोकिया बाजारात पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा प्रयत्न करणार आहे. दोन वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टने नोकिया फोन्सची 7.2 अरब डॉलर्समध्ये खरेदी केली होती.