सुट्टीसाठी आता पृथ्वीबाहेर जा, आयएसएस पर्यटकांसाठी खुलं, खर्च...
एबीपी माझा वेब टीम | 08 Jun 2019 02:09 PM (IST)
खिशात कोट्यवधी रुपये असतील तर तुम्ही थेट पृथ्वीच्या कक्षेबाहेर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थान म्हणजेच इंटरनॅशन स्पेस स्टेशनमध्ये राहायला जाऊ शकता.
मुंबई : सुट्टीत फिरायला कुठे जायचं या प्रश्नासाठी आता आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र यासाठी तुम्हाला भलीमोठी रक्कम मोजावी लागणार आहे. खिशात कोट्यवधी रुपये असतील तर तुम्ही थेट पृथ्वीच्या कक्षेबाहेर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थान म्हणजेच इंटरनॅशन स्पेस स्टेशनमध्ये राहायला जाऊ शकता. स्पेस स्टेशन पर्यटकांसाठी तयार असल्याचं नासाने सांगितलं आहे. पर्यटक पुढील वर्षी नासाच्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये जाऊ शकतात. यासाठी तुमच्या खिशात 350 कोटी रुपये असायला हवे. तर पर्यटकांना एका दिवसाचे सुमारे 25 लाख रुपये डॉलर मोजावे लागणार आहेत. त्यात ऑक्सिजन आणि टॉयलेटचे 7 लाख 80 हजार आणि जेवण, हवा आणि औषधांच्या 15 लाख 61 हजार रुपयांचा समावेश आहे. दरवर्षी दोन अंतराळ मोहीम आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचे उपसंचालक रॉबिन गॅटेन्स म्हणाले की, "दरवर्षी कमी अवधीच्या दोन खासगी अंतराळ मोहीम आखल्या जातील. या मोहीमेचा खर्च खासगी कंपन्या करतील. खासगी अंतराळ पर्यटकांना आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरपर्यंत जाण्यासाठी तीन दिवसांना कालावधी लागेल. ते अमेरिकेच्या यानातून प्रवास करतील." अंतराळाशी संबंधित संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनची स्थापना करण्यात आली आहे. हे स्पेस स्टेशन पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत आहे. हे स्पेस स्टेशन एक प्रकारचं कृत्रिम उपग्रह आहे, जिथे अंतराळवीर राहतात, काम करतात आणि विविध प्रकारचे प्रयोग करतात. हे स्पेस स्टेशन पर्यटन आणि इतर व्यावसायिक उपक्रमांसाठी उघडत असल्याचं नासाने सांगितलं. 12 पर्यटक आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये जाणार मुख्य आर्थिक अधिकारी जेफ डेविट म्हणाले की, "नासा व्यावसायिक उपक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन खुलं करत आहे. आम्ही हे पहिल्यांदाच करत आहोत. दरवर्षी 12 खासगी अंतराळ पर्यटक आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये जाऊ शकतील." याआधी नासाने स्पेस स्टेशनच्या व्यावसायिक वापरावर बंदी घातली होती. त्यामुळे नासाचे अंतराळवीर इतर कंपनीच्या संशोधनात सहभागी होत नव्हते. अंतराळ मोहीमेसाठी दोन खासगी कंपन्यांची नियुक्ती नासाने या कामासाठी इलोन मस्कची स्पेसएक्स आणि बोईंग या दोन कंपन्यांनी नियुक्ती केली आहे. स्पेसएक्स आपल्या ड्रॅगन कॅप्सूलचा वापर करेल आणि बोईंग स्टारलायनर नावाचं यान बनवत आहे. "क्रूमध्ये कोण कोण असेल, याचा निर्णय खासगी कंपन्याच घेतली. तसंच पर्यटकांना अंतराळ उड्डाणासाठी प्रशिक्षण आणि आरोग्य सेवाही याच कंपन्या देतील," असं नासाने सांगितलं. या कंपन्या अंतराळ पर्यटकाकडून तेवढेच पैसे वसूल करतील जेवढे ते नासाकडून त्यांच्या अंतराळवीरांसाठी घेते. रशियासोबत मिळून स्पेस स्टेशनची निर्मिती दरम्यान, हे स्पेस स्टेशन नासाच्या मालकीचं नाही. 1998 मध्ये याच्या निर्मितीची सुरुवात झाली होती. अमेरिकेने रशियासोबत मिळून हे स्पेस स्टेशन बनवलं होतं. 2001 मध्ये अमेरिकेचे उद्योजक डेनिस टिटो हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले पर्यटक होते. त्यांनी दोन्ही प्रवासासाठी रशियाला दोन कोटी रुपये दिले होते.