मुंबई : आतापर्यंत तुम्ही घर, कार हफ्ता म्हणजे ईएमआयवर घेतले असतील. फार फार तर टीव्ही, फ्रीज यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्ही इन्स्टॉलमेंट्सवर घेतल्या असतील. मात्र यापुढे चक्क कपडेही इन्स्टॉलमेंटवर विकत घेता येणार आहेत, तेही अवघ्या 51 रुपयांच्या मासिक हफ्त्यावर.
ऑनलाईन शॉपिंगची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी फॅशन जगतातील आघाडीची ई कॉमर्स वेबसाईट 'मिंत्राडॉटकॉम'ने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. अशाप्रकारचा पर्याय देणारी मिंत्रा ही भारतातली पहिलीच साईट ठरणार आहे.
मोबाईल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन यासारख्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेताना ग्राहक इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट (ईएमआय) म्हणजेच हफ्त्याने खरेदी करण्याचा पर्याय निवडायचे. त्यामुळे दर महिन्याला अल्प रक्कम आपल्या खात्यातून वजा होते आणि महिन्याच्या खर्चाचं बजेट सांभाळायला सोपं जातं.
यापुढे तुम्हाला कपडेही ईएमआयवर विकत घेता येणार आहेत. दर महिन्याला अवघ्या 51 रुपयांच्या हफ्त्यावर तुम्ही कपडे खरेदी करु शकता. एक हजार 300 रुपयांच्या पुढील किमतीच्या कपड्यांच्या खरेदीवर ही सुविधा मिळणार आहे.
फ्लिपकार्टची मालकी असलेल्या मिंत्राने यासाठी आयसीआयसीआय, एचडीएफसी, सिटी बँक, एचएसबीसी यासारख्या आघाडीच्या बँकांशीही करार केला आहे.