मुंबई : जगभरात सध्या पोकेमॉन गो हा ऑनलाईन गेम धुमाकूळ घालत आहे. अक्षरशः देहभान हरपून विविध वयोगटातल्या व्यक्ती हा खेळ खेळतात. मात्र यापुढे मुंबईतल्या रस्त्यांवर हा खेळ खेळण्यास बंदी येऊ शकते. संभाव्य धोके पाहून मुंबई पोलिसांनी तशी तयारी सुरु केल्याची माहिती आहे. रस्त्यांवर पोकेमॉन पकडण्यासाठी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या गेमर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच कठोर नियमावली आखण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरु केल्या आहेत. मुंबई पोलिसांनी पोकेमॉन गो गेमबाबत एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. https://twitter.com/MumbaiPolice/status/757102357381394432 पोकेमॉन गो हा गेम अद्याप अधिकृतपणे भारतात उपलब्ध झाला नसला, तरी देशभरात धुमाकूळ घालत आहे. हा गेम खेळण्याच्या नादात आजूबाजूला दुर्लक्ष होतं आणि अपघात घडतात. हे टाळण्यासाठी मुंबई पोलीस ट्विटरसारख्या सोशल मीडियावरुन जनजागृती करणार आहे.
गेम खेळणाऱ्यांसाठी कठोर नियमावलीही आखण्यात येईल, असं काही पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ही नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी पोकेमॉन गो भररस्त्यात किंवा गर्दीच्या ठिकाणी खेळण्यावर निर्बंध आणले जाऊ शकतात, अशी माहिती आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईत पोकेवॉक आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर या गेमच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यूझर्सच्या सुरक्षिततेबरोबरच इतरांची सुरक्षा, वाहतूक आणि अपघात टाळणे यालाही पोलिसांकडून प्राधान्य देण्यात येणार आहे.
पोलिसांनी याबाबतची नियमावली जाहीर केली नसली तरी रस्ते तसेच गर्दीच्या ठिकाणी हा गेम खेळण्यास मनाई करण्यात येण्याची शक्यता आहे. खासगी ठिकाणं, मैदानं, उद्यानं किंवा सुरक्षित ठिकाणी पोकेमॉन गो खेळण्याची मुभा असेल. सुरुवातीच्या टप्प्यात रस्त्यांवर किंवा गर्दीच्या जागी पोकेमॉन गो खेळणाऱ्यांना समज देण्यात येईल. मात्र त्यात सुधारणा न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
काय आहे पोकेमॉन गो?
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधल्या तरुणाईवर सध्या पोकेमॉन गोचं याड लागलं आहे. हा गेम खेळायला एकदा सुरुवात केली की तुमच्या मेंदूचा कंट्रोल मोबाईलनं घेतलाच समजा कारण माणूस या गेमच्या विश्वातच हरवून जातो. गेम खेळताना मोबाईलचा कॅमेरा आणि जीपीएस सुरु ठेवावा लागतो आणि पोकेमॉनला कॅमेऱ्यात कैद करावं लागतं. लोकेशन आणि मोबाईलमधल्या वेळेच्या आधारावर कुठला पोकेमॉन आपल्यासमोर येईल, हे गेमच्या अॅपकडून निश्चित केलं जातं. या गेम्सने सध्या सर्वांना आकर्षित केलं आहे.
पोकेमॉन लवकरच भारतात
गेमच्या लोकप्रियतेमुळे पोकेमॉन गो लाँच करणाऱ्या नितांडो कंपनीचं नशिब फळफळलं आहे. बंद पडण्याच्या अवस्थेत असलेल्या या कंपनीचा शेअर 12 दिवसात 53 टक्क्यांनी म्हणजेच 95 हजारांनी वाढला आहे. हा गेम पोकेमॉनच्या शोधात फिरायला लावतो. त्यामुळे गेमसाठी फिरताना भान हरवल्याने एकाचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. तर 11 जणांना लुटल्याचंही समोर आलंय. त्यामुळे गेम खेळताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे.