मुंबई : मोटोरोलाने भारतात मोटो जी 6 प्लस हा नवा स्मार्टफोन लाँच केला. फोनची किंमत 22 हजार 499 रुपये ठेवण्यात आली आहे. मोटो जी 6 प्लस आजपासून सर्व रिटेल स्टोअर्स आणि अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

मोटो जी सीरिजमध्ये हा सर्वात लेटेस्ट फोन आहे. यापूर्वी जूनमध्ये कंपनीने मोटो जी 6 आणि मोटो जी 6 प्ले हे दोन फोन लाँच केले होते. फोन खरेदी केल्यानंतर युझर्सना पेटीएम मॉलवर कॅशबॅक मिळेल, तर रिलायन्स जिओकडूनही डेटा ऑफर देण्यात आली आहे.

लाँचिंग ऑफर्स आणि इतर सुविधा

पेटीएम मॉलवरुन फोन खरेदी केल्यास युझर्स तीन हजार रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. ही ऑफर मिळवण्यासाठी युझर्सना पेटीएम मॉल अॅपमध्ये प्रोमो कोड टाकावा लागेल. तर युझर्सना फिनसर्वकडून नो कॉस्ट ईएमआयचीही सुविधा देण्यात आली आहे.

रिलायन्स जिओचे ग्राहक फोन खरेदी केल्यास 4450 रुपयांचा फायदा मिळवू शकतात. यासाठी 198 आणि 299 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल, ज्यामुळे जिओकडून 2200 रुपये कॅशबॅक मिळेल. कॅशबॅक जिओमनीमध्ये क्रेडिट होईल. यासोबतच युझर्सना क्लिअरट्रिपकडून कॅशबॅक व्हाऊचर दिलं जाईल, जे 1250 रुपयांचं असेल, तर अजियोकडून एक हजार रुपये डिस्काऊंट मिळेल.

किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 5.9 इंच आकाराची एचडी स्क्रीन, अँड्रॉईड ओरियो 8.1 सिस्टम, स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज, डॉल्बी ऑडिओ सपोर्ट आणि फिंगरप्रिंट सेन्सर असे फीचर्स देण्यात आले आहेत.

याशिवाय 12 आणि 5 मेगापिक्सेल कॅमेरा, जो गुगल लेंस सपोर्टेज आणि क्यूआर कोड स्कॅनरसह असेल. फोनचा फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा आहे, जो अनलॉक फीचरसोबत येईल.